Mumbai : ‘चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांतील मार्गदर्शक दुवा निखळला, कलाक्षेत्राची हानी’

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची ऋषी कपूर यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दुवा निखळला आहे, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्व हरपले आहे, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले, अभिनयातील मानदंड पृथ्वीराज कपूर, द ग्रेट शो-मन राज कपूर यांच्या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही. कुटुंबाचा हा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पेलला. निखळ करमणूक आणि चित्रपट सृष्टीत आशयाच्या, तंत्रज्ञानाच्या अंगाने नवे प्रयोग करण्यात ते यशस्वी ठरले. चित्रपटसृष्टीचा कलात्मक अंगिकार ते ‘फिल्म इंडस्ट्री’ पर्यंतच्या प्रवासात ते सक्रिय राहीले. ते सहज सुंदर अभिनेता होते, तितकेच ते परखड आणि प्रांजळ व्यक्ती होते.

रंगभूमी, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्वाप्रमाणे सर्जनशील ठसा उमटविला आहे. चित्रपट सृष्टीतील नव्या पिढीसाठी ते आश्वासक मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने कलाकारांच्या दोन पिढ्यांना जोडणारा दुवा निखळला आहे. भारतीय कला क्षेत्राची हानी झाली आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला आहे. सतत आनंदी, उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं. त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला. ‘कपूर’ कुटुंबाचा कलेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. काल इरफान खान यांचं निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरच धक्कादायक, वेदना देणारं आहे.

उपमुख्यमंत्री शोकसंदेशात पुढे म्हणाले की, ऋषी कपूर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी  होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नातं, संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते. भारतीय चित्रपट जगताच्या इतिहासात त्याचं नाव, त्यांचा अभिनय अजरामर राहील, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याचे बळ कपूर कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.