Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही, काँग्रेसवर दबाव

Mumbai: Chief Minister urges unopposed Legislative Council elections, pressure on Congress to withdraw one candidate

एमपीसी न्यूज – विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहे. काँग्रेसने एक ऐवजी दोन उमेदवार जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसने दोन ऐवजी एकच उमेदवारी अर्ज भरावा नाही, तर आपण निवडणूक लढविणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी काँग्रेसवर दबाव निर्माण केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (सोमवारी)  शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 14 मेपर्यंत मुदत असून आवश्यकता भासल्यास 21 मेला मतदान होणार आहे. आतापर्यंत शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके व डॉ. अजित गोपछेडे या चौघांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर काँग्रेसने राजेश राठोड व राजकिशोर मोदी यांच्या नावांची घोषणा केली आहे.

राज्यात कोरोनाचे संकट असताना निवडणूक बिनविरोध व्हावी, या बाबत सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत असले तरी एक उमेदवार कोणी मागे घ्यायचा, याबाबत मात्र मतभेद दिसून येत आहेत. सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या तीन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन, काँग्रेसच्या दोन आणि शिवसेनेची एक अशा एकूण नऊ जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केल्यास महाविकास आघाडीच्या पाच आणि भाजपच्या तीन जागा सहज निवडून येतील. नवव्या जागेसाठी मात्र चुरशीची लढत होईल, अशी परिस्थिती आहे.

विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रयत्न आहे. यासाठी काँग्रेसने एका जागेवर उमेदवार द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. परंतु, काँग्रेसकडून दोन उमेदवार उभे करण्यात आले आहेत. काँग्रेसने एकच उमेदवार रिंगणात उतरवून निवडणूक बिनविरोध करावी, असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे.

पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी , एमआयएम, प्रहार जनशक्ती प्रत्येकी दोन, मनसे, माकप , शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी एक व 13 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेवरून चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपला त्यांच्या कोट्यानुसार चौथ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी फक्त अधिकच्या चार मतांची गरज आहे. ती मते ते सहजपणे मिळवू शकतात असा भाजपचा दावा आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.