Mumbai News : पोलिसांच्या पाल्यांना उद्योजक बनविण्याचा आयुक्त कृष्णप्रकाश यांचा उपक्रम कौतुकास्पद; गृहमंत्र्यांकडून कौतुक

एमपीसी न्यूज – सेवेत कार्यरत असलेले तसेच सेवानिवृत्त पोलिसांच्या पाल्यांना उद्योजक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नवीन उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत पोलिसांच्या पाल्यांना प्रशिक्षण आणि सवलतीसह कर्ज उपलबध करून दिले जाणार आहे. यामुळे पोलिसांच्या पाल्यांमधून भावी उद्योजक होण्यासाठी याची मदत होणार आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांच्या पाल्यांना उद्योजक बनविण्यासाठी प्रशिक्षण व सवलतीसह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. कृष्ण प्रकाश यांनी पोलीस पाल्यांच्या भविष्याच्या दृष्टीने घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे.”

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कामगिरीचे गृहमंत्री अनिल देशमुख वेळोवेळी कौतुक करतात. 5 नोव्हेंबर रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस नाईक आबासाहेब सावंत यांनी जीवाची बाजी लावून नियमभंग करणा-या वाहन चालकावर कारवाई केली. त्यात ते जखमी झाले. त्यावेळी गृहमंत्र्यांनी पोलीस नाईक सावंत यांचा मुंबईत सत्कार केला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अंधांच्या संवेदना जाणून घेण्यासाठी जागतिक अंध दिनाच्या दिवशी स्वतः डोळ्यावर काळी पट्टी बांधली. अंध बांधवांच्या व्यथा, वेदना व गरजा या बाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी अंध विद्यार्थ्यांना पांढऱ्या काठीचे वाटप केले. याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले होते.

काय आहे उपक्रम

पोलीस हा घटक अनेक वेळेला दुर्लक्षित राहतो. त्यात ड्युटीची वेळ निश्चित नसल्याने कुटुंबाकडे लक्ष कमी होते. आपल्या मुलामुलींसाठी अनेक गोष्टी करण्याचे नियोजन पोलिसांच्या केवळ मनातच असते. यावर उपाय काढत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नवीन संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पनेत पोलिसांच्या मुलामुलींना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे यांच्या सह्कार्याने पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलिसांच्या पाल्यांसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त झालेल्या सर्व पोलिसांच्या पाल्यांची माहिती जमा करून त्यांना या उपक्रमाबाबत माहिती सांगण्यात येणार आहे. त्यानंतर एका मेळाव्याचे आयोजन करून त्यात त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे.

पोलिसांच्या सर्व पाल्यांना स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. या उपक्रमातून शासनाकडून बँकेच्या माध्यमातून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकणार आहे. या कर्जावर 15 ते 35 टक्क्यांची शासनाची सबसिडी देखील आहे. यातून पोलिसांचे पाल्य मोठ्या प्रमाणात भावी उद्योजक होण्यास मदत होईल.

या उपक्रमांतर्गत फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया, सोलर प्रक्रिया, हाऊस किपींग, केटरिंग, गार्डनिंग, टू व्हीलर गॅरेज, इलेक्ट्रिकल होम अप्लायन्सेस, मसाले, पॅकेजिंग, गारमेंट मेकिंग, पेंटस, प्लम्बिंग आणि अन्य प्रकारचे उद्योग करता येणार आहेत. कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या पाल्यांची माहिती जमा करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.