Mumbai: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण अन् रोजगार देण्याचा संकल्प

Mumbai: Commitment to provide skill training and employment to unemployed youth on the backdrop of Corona नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयं आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत.

एमपीसी न्यूज- जागतिक युवा कौशल्य दिन आज (दि.15) सर्वत्र साजरा केला जाणार असून यानिमित्त राज्य शासनामार्फत स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत असलेली बेरोजगारी दूर करुन सर्व गरजूंना आणि त्यानंतर योग्य रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग संकल्प करीत आहे. विभागामार्फत यासाठी व्यापक कार्य केले जाईल, अशी घोषणा विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी केली.

एकही तरुण बेरोजगार नको
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मंत्री मलिक यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात अनेकजण रोजगारापासून वंचित झाले असून ते सर्वांसमोरच मोठे आव्हान आहे. या आव्हानावर मात करुन सर्वांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन व्यापक प्रयत्न करीत आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या नावात आता रोजगाराचाही समावेश करण्यात आला आहे. नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयं आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. सध्याची लॉकडाऊनची स्थिती बघता राज्यभरात ऑनलाइन रोजगार मेळावे आयोजित केली जात आहेत.

कौशल्य विकास विभाग याचे समन्वय करीत आहे. याशिवाय शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी तसेच रोजगार इच्छुक तरुण यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागामार्फत ऑनलाइन समुपदेशन करण्यात येत आहे.

आता लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शासनाच्या निर्णयानुसार आयटीआय आणि विविध प्रशिक्षण संस्थांचे प्रवेश सुरु होऊ शकतील. भविष्यात कौशल्य विकासाच्या सर्व प्रशिक्षण योजना प्रभावीपणे राबवून राज्यात एकही तरुण रोजगाराशिवाय राहणार नाही यासाठी विभाग प्रयत्न करेल, असे ते म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

स्वयंसेवी संस्थांमार्फत विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट
सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत बेरोजगार तरुणांसाठी ब्युटी आणि वेलनेस, विविध घरगुती उपयोगाच्या वस्तुंची दुरुस्ती, मोबाइल रिपेरिंग, बेकरी, ज्वेलरी डिझाइन, माध्यमे, करमणूक आणि क्रीडाविषयक अशी विविध कौशल्य प्रशिक्षणे दिली जातात.

सध्या विद्यार्थ्यांना ही प्रशिक्षणे ऑनलाइन दिली जातात. या विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेमार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात येणार आहेत. आज होणाऱ्या वेबिनारमध्ये या मोहिमेचा ऑनलाइन प्रतिनिधीक शुभारंभ करण्यात येईल.

तसेच स्किल डेव्हलपमेंट फोरम यांच्यामार्फत आज सकाळी 10.30 वाजता वेबिनार आयोजित केला आहे. यात ‘कौशल्यावर आधारित तरुणाई-काळाची गरज’ व ‘कोविड पश्चात कौशल्य विकासाचे योगदान’ या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://event.webinarjam.com/register/125/gqxrns55या लिंकवर नोंदणी करावी.

फेसबुक लाइव्ह संवादाचे आयोजन
याशिवाय राज्यातील विविध कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांमार्फतही आज ऑनलाइन संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थी व संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.

मंत्री नवाब मलिक हे राज्यातील विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. फेसबुक लाइव्ह संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा संवाद दुपारी 3 वाजता फेसबुकवर http://www.facebook.com/dvetms या पेजवर तसेच युट्यूबवर DVET E-Learning Channel या चॅनलवरुन होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.