Mumbai: बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन ;अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जिद्दीने यशस्वी व्हावे

Congratulations from the Deputy Chief Minister to the students who have passed 12th standard; the students who have failed should be stubbornly successful

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्या बारावी (एचएससी) परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, त्यांच्या पालकांनीही निराश होऊ नये, यानंतरच्या परीक्षेत पूर्ण ताकदीने प्रयत्न करावा, जिद्दीने यश मिळावावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

बारावी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीची, भविष्याची दिशा स्पष्ट होत असते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडावा, पालकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण मुभा द्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौशल्यविकासावर, खेळ-व्यायामाकडेही लक्ष द्यावे. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केली आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता पुन्हा यशस्वी होण्याची जिद्द बाळगली पाहिजे. केवळ एका परीक्षेतील अपयशाने सर्व दारे बंद होत नाहीत. एक दार बंद होते तेव्हा शंभर दारे खुली करण्याची जिद्द बाळगली पाहिजे.

जीवनात करण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्यांचा शोध घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा व तिथे यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असा संदेशही त्यांनी समस्त विद्यार्थी मित्रांना दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.