Mumbai : कोरोना इफेक्ट! BCCI नुकसान भरपाईसाठी कसोटी आणि T-20 साठी वेगवेगळ्या टीम करण्याच्या तयारीत

Mumbai: Corona effect! BCCI prepares to field different teams for Tests and T-20s for compensation

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूमुळे क्रीडा विश्वात शांतता पसरली आहे. मार्च महिन्यातील IPL सह इतर सर्व सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. अशा परिस्थितीत BCCI नुकसान भरून काढण्यासाठी कमी कालावधीत जास्त सामने खेळवण्याची तयारी करत आहे. त्यासाठी कसोटी आणि T-20 साठी वेगवेगळ्या टीम बनवण्याचा विचार सुरू आहे.

BCCI च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, BCCI ला स्पाॅन्सर आणि चाहते या दोघांचा विचार करणे गरजेचे आहे. कोरोना संकटात सामने कधी खेळवले जाऊ शकतात याबद्दल काहीही सांगता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एकच पर्याय समोर दिसतो तो म्हणजे कसोटी आणि T-20 साठी वेगवेगळ्या टीम बनवून एकाच वेळी कसोटी आणि T-20 सामने खेळवले जावेत.

BCCI ला ब्राॅडकास्टरचे हित लक्षात घेऊन दोन टीम बनवणे गरजेचे आहे. जेणे करून दिवसा कसोटी सामने खेळवले जाऊ शकतात आणि रात्री फ्लड लाईटच्या मदतीने  T-20 सामने खेळवले जाऊ शकतात. यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने 2017 मध्ये असे करून एकाच वेळी कसोटी आणि T-20 सामने खेळवले होते. आपल्याला सुद्धा दोन टीम बनवून दोन कोचिंग स्टाफ तयार ठेवावे लागतील. IPL झाले नाही तर BCCI ला चार हजार कोटींचे नुकसान अपेक्षित आहे.

यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया बरोबर चार कसोटी तर तीन एकदिवसीय सामने नियोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्यावर गेल्यानंतर भारतीय संघाला 14 दिवस क्वारंटाईन करण्याची परवानगी BCCI ने दिली आहे. भारतीय संघाचे चीफ सिलेक्टर सुनील जोशी यांनी सीझनची सुरुवात T-20 सामने खेळवून करण्याचा सल्ला दिला आहे. याचा फायदा भारतीय संघाला T-20 विश्वचषक सामन्यासाठी होईल असे त्यांचे मत आहे.

यावर्षीच्या सुरवातीला ऑस्ट्रेलिया बरोबर झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला 2-1 ने मात दिली होती. भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा याने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया बरोबर खेळण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचं डेव्हीड वॉर्नरला बोलून दाखवलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.