Mumbai : ‘या’ कलाकारांची ‘आपली माणसं’ आहेत करोना वॉरियर
Mumbai : Corona Warrior in the artist's home

एमपीसी न्यूज – करोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी सध्या आपण सगळेच सज्ज आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का, चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची ‘आपली माणसं’ देखील करोना वॉरियर आहेत. ते देखील करोनाशी प्राणपणाने झुंज देत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळीची मावशी, डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी, ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत वच्छीची भूमिका साकारणाऱ्या संजीवनी पाटील यांचे पती, ‘विठू माऊली’ मालिकेतील अजिंक्य राऊतची आई हे करोना योद्धा म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी काम करत आहेत.
अभिनेत्री प्राजक्ता माळीची सख्खी मावशी पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये सीनिअर नर्स म्हणून काम करत आहेत. त्या सीनिअर नर्स असल्याने कोविड १९ रुग्णांच्या वॉर्डमध्येच काम करत आहेत. सलग १५ दिवस त्या वॉर्डमध्ये ड्युटी केल्यानंतर पुढील १५ दिवस त्यांना स्वत:ला क्वारंटाइन करायचं असतं. तसेच हे काम केल्यामुळे त्या त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत. सध्या त्या हॉस्टेलमध्येच राहतात. घरी जाऊन कुटुंबियांना त्या भेटू शकत नाहीत. त्यांच्या दोन मुली आणि पती कुटुंब सांभाळत आहेत. त्या मात्र कुटुंबीयांपासून लांब राहून त्या करोना रुग्णांची सेवा करत आहेत.
अशीच गोष्ट आहे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी अमोल कोल्हे यांची. त्यासुद्धा करोना विरोधात मैदानात उतरल्या आहेत. मुंबईतील केईएम रुग्णालयात डॉ. अश्विनी कोल्हे या २००९ पासून कार्यरत आहेत. रोज सकाळी उठून घरातील कामं, दोन्ही मुलांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था करून रोजच्या वेळेवर हॉस्पिटलमध्ये हजर असतात.
‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेतील वच्छीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री संजीवनी पाटील यांचे पती पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ‘आपलेच रक्षण करणाऱ्या पोलिसांना मारहाण करणाऱ्या घटना समोर आल्यावर माझा खूप संताप होतो’, असं त्या म्हणतात. त्याचसोबत करोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी घरीच थांबलं पाहिजे, असं आवाहन त्या लोकांना करतायत.
‘विठू माऊली’ या मालिकेत काम करणाऱ्या अजिंक्य राऊतची आई परभणी येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत आहेत. अजिंक्य म्हणतो की, ‘आम्ही घरी सुरक्षित आहोत. पण आई रुग्णालयात काम करीत आहे. जास्तीत जास्त वेळ ड्युटी बजावत त्या रुग्णांची सेवा करत आहेत. ती मल्टीटास्कर आहे. आणि कितीही काम असले तरी ती थकत नाही’.