Mumbai: राज्यात ‘कोरोना’चे 64 रुग्ण; एकाच दिवशी सापडले 12 रुग्ण

एमपीसी न्यूज – कोरोनाचे राज्यात आज ( शनिवारी ) एकूण 12 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील, तर 2 जण पुण्यातील आहेत. तर यवतमाळ आणि कल्याण येथील प्रत्येकी 1 रुग्ण असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.

मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे. तर, एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून, आणखी एका रुग्णने गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील पण मुंबई येथील रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केला आहे.

कल्याण येथील कोरोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील 25 वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक 41 वर्षाची पुण्यातील महिला कोरोना बाधित आढळलेली आहे. ही महिला बाधित होण्यामागचे नेमके कारण तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे, अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.