Mumbai Crime News : …अखेर ‘त्या’ फरार सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज – फरार घोषित असलेला मागील काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. हा सराईत चोरटा वेषांतर करण्यात पटाईत होता, तसेच चोरीचे फोन वापरुन वारंवार सिम बदलत होता. पोलीस ठाण्यात वेगवेगळा पत्ता नोंदवल्याने आरोपीला शोधणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले होते. अखेर अथक परिश्रमाने पोलिसांनी त्याच्या मुसक्या पुन्हा आवळल्या आहेत.

ओम उर्फ पप्पू बाळकृष्ण सातपुते (वय 34) असे या अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार राजेंद्र खैरनार, शिपाई दाभाडे व शिंदे यांनी आरोपीला परत अटक करण्यास अथक प्रयत्न केले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर न्यायालयाने आरोपीला 26 जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आरोपी ओम सातपुते याच्यावर एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर राहत नसल्याने मुलुंड न्यायलयाने त्याला 11 सप्टेंबर 2018 रोजी फरार घोषित केले होते. सातपुते पोलीस ठाण्यात नातेवाईक राहत असलेला खोटा पत्ता देत होता त्यामुळे त्याचा शोध घेणं अवघड होत होते. पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या सहाय्याने वेगवेगळ्या पत्त्यावर चौकशी करून अखेर त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.