Mumbai : नोंदित सक्रीय बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय – दिलीप वळसे-पाटील

12 लाखापेक्षा अधिक कामगारांना मिळणार लाभ

एमपीसी न्यूज – राज्यातील नोंदित सक्रीय बांधकाम कामगारांना 2 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला आहे. आर्थिक सहाय्याची ही रक्कम ‘डीबीटी’ पद्धतीने कामगारांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. या निर्णयाचा राज्यातील 12 लाखांपेक्षा अधिक कामगारांना  लाभ मिळणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमध्ये राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद आहेत. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लाॅकडाऊनमुळे बांधकाम कामगारांना विविध आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.  या निर्णयामुळे महाराष्ट्रातील इमारत व इतर बांधकाम कामगार, कल्याणकारी मंडळातील बांधकाम कामगारांना दिलासा मिळणार असल्याचे मत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.