Mumbai : अभियंता मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना बडतर्फ करा – फडणवीस यांची मागणी

एमपीसी न्यूज :   फेसबुकवर पोस्ट का टाकली ?,  असा जाब विचारत एका अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बडतर्फ करण्यात यावे,  अशी मागणी माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यावर आव्हाड यांनी सडकून टीका केली होती. आव्हाड यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देणारी एक कॉमेंट ठाणे येथील अभियंते अनंत करमुले (वय ४०) यांनी फेसबुकवर टाकली होती. याकारणाने आव्हाड यांच्या उपस्थितीत आपल्याला काठी तुटेपर्यंत मारण्यात आले, अशी तक्रार करमुले यांनी केली.

यावर तीव्र प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी  म्हणाले,  एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने मंत्र्यांच्या घरी नेऊन मंत्र्यांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्र्यांनी आव्हाड यांना  मंत्रिमंडळातून   तत्काळ बडतर्फ करावे.

सोशल मिडियाचा कुणी चुकीचा वापर केला तर तक्रार करण्याचा आपला अधिकार अबाधित आहे. पण, शासनकर्तेच मारहाण करीत असतील तर, कायद्याचे राज्यच अस्तित्वात रहाणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.