Mumbai: दिलासादायक! राज्यात आठवडाभरात 3700 रुग्णांना डिस्चार्ज, कोरोनामुक्तांचेही दुपटीकरण!

Mumbai: Discharge of 3,700 Corona cured patients in a week, doubling of recovered patients in Maharashtra!

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाने कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत सुधारित धोरण जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात राज्यातील डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 7,688 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यापैकी जवळजवळ निम्मे म्हणजे 3,700 रुग्ण गेल्या आठवड्यात बरे झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाने कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत जाहीर केलेल्या सुधारित धोरणानुसार कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना 14 दिवसांऐवजी 10 व्या दिवशी घरी सोडण्यात येत आहे. यामुळे बरे झालेल्या रूग्णांची  संख्या देखील झपाट्याने वाढत आहे.
राज्यात बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण या एका आठवड्यात बरे झाले आहेत. आज (रविवारी) आतापर्यंत सर्वाधिक 600 हून अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुमारे 7688 एवढी आहे. विशेष म्हणजे बरे होणारे सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, पुणे, नाशिक व मालेगाव या भागातील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

या आठवड्यातील दिवसनिहाय कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
  • 10 मे – 399
  • 11 मे – 587  
  • 12 मे – 339 
  • 13 मे – 422 
  • 14 मे – 512
  • 15 मे – 505
  • 16 मे – 524 
  • 17 मे – 600

 अशा प्रकारे या एका आठवड्यामध्ये 3700 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 

राज्यात आजपर्यंत 7,688 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यातील 50 टक्के रूग्ण हे 10 ते 17 मे या कालावधीतील आहेत. साधारणत: मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बरे झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडले जात आहे. मार्चमध्ये दोन अंकी असलेली ही संख्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून तीन अंकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.