Mumbai: जून महिन्यात आतापर्यंत २२ लाख ५५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप- छगन भुजबळ

Distribution of 22 lakh 55 thousand Shiva food plates till June - Chhagan Bhujbal

एमपीसी न्यूज – राज्यातील 52 हजार 441 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जून ते 22 जूनपर्यंत राज्यातील 1 कोटी 20 लाख 11 हजार 138 शिधापत्रिका धारकांना 45 लाख 7 हजार 700 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच 22 लाख 55 हजार 562 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 441 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.

राज्यात या योजनेमधून सुमारे 16 लाख 42 हजार 29 क्विंटल गहू, 12 लाख 56 हजार 677 क्विंटल तांदूळ, तर 17 हजार 352 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले.

त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 2 लाख 95 हजार 45 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टिबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.

दि. 5 जूनपासून एकूण 55 लाख 99 हजार 353 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 2 कोटी 51 लाख 1 हजार 359 लोकसंख्येला 12 लाख 55 हजार 70 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे.

या धान्याचे जून 2020 मध्ये आतापर्यंत 3 लाख 10 हजार 920 क्विंटल वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे 1 लाख 91 हजार 221 क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.

आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे.

आतापर्यंत 43 हजार क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.

राज्यात 1 जून ते 22 जूनपर्यंत 849 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 22 लाख 55 हजार 562 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच एप्रिल ते जून या कालावधीत 80 लाख 39 हजार 339 शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.