Mumbai : राज्यातील 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित – हसन मुश्रीफ

Mumbai: Election of 12,668 gram panchayats in the state postponed - Hasan Mushrif

  • 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपणार जुलै ते डिसेंबर दरम्यान
  • मुदत संपल्यानंतर ग्रामपंचायतीवर नेमला जाणार प्रशासक

एमपीसी न्यूज – राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थगित करण्याबाबत राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, राज्यात जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घ्यावयाच्या झाल्यास त्यासाठी कर्मचारी प्रशिक्षण, निवडणूक यंत्रणेवर ताण, वोटींग मशिनचा सामुदायिक वापर, प्रचारासाठी होणारी गर्दी, सभा, मेळावे, पदयात्रा या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी अनेक लोक एकत्र येण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता अशी गर्दी धोकादायक ठरु शकते. शिवाय, ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी करणे, प्रभागाची रचना प्रस्तावित करणे, प्रभागनिहाय मतदारयादी तयार करणे आदी बाबींकरिता मोठा वेळ लागतो. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच प्रस्तावित निवडणुकांमुळे वाढणारी तीव्र जोखीम लक्षात घेऊन या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात व पुढील 6 महिने कोणत्याही निवडणुका न घेण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी विनंती राज्य शासनामार्फत राज्य निवडणुक आयोगाकडे करण्यात आली होती.

दरम्यान, राज्य शासनाच्या विनंतीस प्रतिसाद देत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे की, निवडणूक आयोगाच्या 17 मार्च 2020 रोजीच्या पत्रानुसार जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनाही त्या ज्या टप्प्यावर असतील त्याच टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे.

ज्या ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपेल तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करण्याची दक्षता घ्यावी. तसेच राज्य निवडणूक आयोग वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरील स्थगिती उठविण्याबाबत व निवडणुका घेण्याबाबत निर्णय घेईल, असेही आयोगाकडून राज्य शासनाला कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.