Mumbai : मुलाच्या लग्नपत्रिका वाटत असतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज- मुलाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या एका पित्याचा लोकलमधून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कुर्ला स्टेशनजवळ बुधवारी (दि. 5) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

तानाजी लवांगरे (वय 59) असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे.

लवांगरे हे मुलाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आले होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुर्ला स्टेशनच्या फलाट नं 6 वर तानाजी लवांगरे रुळावर जखमी अवस्थेत पडलेले आढळून आले. रेल्वे पोलिसांनी त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात हलवले. तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता.

सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये ते उभे असताना पाय घसरुन ते रुळावर पडले असावेत असा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. लवंगारे यांच्या बॅगेमध्ये लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांचा गठ्ठा होता. त्यावर त्यांचे नाव आणि पुण्याचा पत्ता लिहिलेला होता. तानाजी लवांगरे यांचा फोन तपासल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा सुमित याला फोन करून घटनेची माहिती दिली. 19 जून रोजी आपले लग्न होणार असून वडील नातेवाइकांना निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी मुंबईला गेले आहेत असे सांगितले. लवांगरे यांची मुलगी ऐरोली येथे रहाते. तिच्या घरी त्यांनी निमंत्रण पत्रिका दिली व मुंबईतील अन्य नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी ते फिरत असताना ही दुर्देवी घटना घडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.