Mumbai : कोरोनाच्या संकटकाळात पोलीस अधिकार्‍यांना परीक्षा देण्याचा फतवा

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र पोलीस अकादमीतील परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलीस अधिकार्‍य‍ांची दोन वर्षाच्या आत खातेअंतर्गंत परीक्षा घेणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या सात वर्षात परीक्षा न घेता आता कोरोनाच्या संकटकाळात त्यांना परीक्षेला सामोरे जाण्याचा अजब फतबा शासकिय पातळीवर निघाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍य‍ांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाच्या या आदेशाने मागील आठ ते दहा वर्ष पोलीस उपअधीक्षक दर्जावर काम करणार्‍या महाराष्ट्रातील 170 अधिकार्‍यांच्या भवितव्यावर टांगती तलवार आली असताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मात्र ही परीक्षा प्रचलित कायद्याप्रमाणे असून त्यामध्ये नविन असे काही नाही असे म्हंटले आहे.

पोलीस खाते वगळता शासनाच्या इतर विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था नाही.

महाराष्ट्र पोलीस अकादमी ही स्वतंत्र स्वायत्त संस्था असून याठिकाणी प्रशिक्षण कालावधीत दोन सहामाही परीक्षा घेतल्या जातात. त्या उत्तीर्ण होणे संबंधित अधिकार्‍यांना बंधनकारक असते.

इतर कोणत्याही विभागात अशी रचना नाही. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अधिकार्‍य‍ांची पुन्हा खातेर्गंत परीक्षा घेतली जाते.

मात्र, 2013 सालापासून कोणतेही कारण न देता ही परीक्षा घेतली गेलेली नाही. या कालावधीत राज्यातील तब्बल 170 पोलीस अधिकारी यांची डीवायएसपी व एसीपी या पदावर नियुक्ती झाली आहे.

मागील सात ते दहा वर्षापासून ते या पदावर काम करत असताना आता त्यांना त्या पदावर काम करण्याकरिता पात्र असल्याची परीक्षा द्यावी लागणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

सदरची परीक्षा ही शासनाने जाहिर केलेल्या नविन अभ्यासक्रमानुसार होणार आहे.

सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ही परीक्षा घेतली जाणार असल्याने कोरोना योद्धा म्हणून काम करायचे की सुट्टी घेऊन परीक्षेचा अभ्यास करायचा, असा प्रश्न या अधिकार्‍य‍ांच्या समोर उभा राहिला आहे.

मागील अडिच महिन्यापासून सर्व पोलीस अधिकारी रात्रंदिवस कोरोना विरुद्धच्या लढ्यात काम करत आहेत.

कोरोना काळात शासनाने सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द केलेल्या असताना तब्बल दहा वर्षानंतर या कोरोना संकट काळात पोलीस अधिकार्‍य‍ांच्या परीक्षेचा घाट का घातला जात आहे, असे प्रश्न अधिकारी उपस्थित करत आहेत.

दहा वर्षापुर्वी तेव्हाच्या अभ्यासक्रमानुसार पोलीस अकादमीत परीक्षा पास झाल्यानंतर आता नविन अभ्यासक्रमानुसार पुन्हा तीच परीक्षा देताना कोणी अधिकारी नापास झाल्यास त्याच्या आतापर्यतच्या कामावर व तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.

दोन वर्षाच्या आत नियुक्त झालेल्या अधिकार्‍य‍ांच्या परिक्षा घेऊन इतरांना परीक्षा प्रक्रियेतून वगळावे, अशी मागणी हे अधिकारी करत आहेत.

महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी ह्या परीक्षा प्रचलित कायद्याप्रमाणे असल्याचे सांगताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदरची परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविल्याने शासनाकडून महाराष्ट्र पोलीस अकादमी मार्फत ही परीक्षा घेतली जात असल्याचे सांगितले.

पोलीस अधिकार्‍य‍ांनी परीक्षेची भिती न बाळगता परीक्षेला सामोरे जावे, एका प्रयत्नात परीक्षा पास न झाल्यास पुन्हा प्रयत्न करावे, असे म्हणत अधिकार्‍य‍ांच्या जखमेवर मिळ चोळले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.