Mumbai : पूरग्रस्त सोसायट्यांची घरे मालकीची होणार – गिरीश बापट

मंत्री मंडळाचा निर्णय

एमपीसी न्यूज- पानशेत पूरग्रस्तांच्या एकशेतीन सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी त्या त्या सोसायट्यांना मालकी हक्काने देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य मंत्रीमंडळाने आज घेतला. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना दिली. मूळ पूरग्रस्तांना 1976 रोजी निश्चित केलेली किंमत अधिक व्याजाची रक्कम भरावी लागेल असेही बापट यांनी सांगितले.

बापट म्हणाले की, ज्यांनी पूर्वपरवानगी घेऊन हस्तांतरण केले असेल त्यांना १९७६ मध्ये निश्चित केलेली किंमत अधिक व्याज व पन्नास टक्के अधिक एवढी रक्कम मालकी हक्कासाठी भरावी लागणार आहे. पूर्वपरवानगी न घेता ज्यांनी हस्तांतरण केले आहे त्यांना जमिनीची निश्चित झालेली किंमत, व्याज व शंभर टक्के अधिक एवढी रक्कम भरावी लागणार आहे. ज्यांनी या जागेचा कमर्शियल वापर केला आहे. त्यांना मालकी हक्क देण्यासाठी स्वतंत्र नियम करण्यात आले आहेत.

बापट पुढे म्हणाले की, जुलै 1961 मध्ये झालेल्या पानशेत पुरानंतर पुणे शहर व परिसरातील अनेक कुटुंबे बेघर झाली होती. त्यांच्या पुर्नवसनासाठी शासनाने आठ वसाहती निर्माण केल्या होत्या. गाळे, ओटे, शेजघऱे, गोलघरे व निसेनहटस असे एकूण 3988 गाळे त्यावेळी बांधण्यात आले होते. सुरुवातीला हे गाळे नाममात्र भाड्याने देण्यात आले होते. तथापि ज्या पूरग्रस्तांना या गाळ्यांमध्ये जागा मिळाल्या नव्हत्या. अशांच्या सोसायट्या स्थापन करून या सोसायट्यांना नव्याण्णव वर्षाच्या भाडे कराराने भूखंड देण्यात आले होते. जमिनी भाडेपट्याने असल्याने या गृहनिर्माण संस्थांना व त्यांच्या सदस्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यांना मालमत्तेवरील कर्ज मिळत नव्हते. मालमत्ता गहाण ठेवता येत नव्हती. शासनाच्या परवानगीशिवाय घरांची विक्री करता येत नव्हती. म्हणून या सोसायट्यांकडून घरे मालकी हक्काने करून द्यावीत अशी मागणी होत होती. ती आज मंत्रीमंडळाने पूर्ण केली.

भारतीय जनता पक्षाने वचननाम्यामध्ये पूरग्रस्तांना मालकीची घरे देण्याचे आश्वासन दिले होते. राज्य मंत्रीमंडळाने त्याची पूर्तता केली. याचा मला अधिक आनंद होतो आहे. असेही बापट यांनी नमूद केले. यासाठी महसूल विभागाने गेल्या वर्षभरात अनेक बैठका घेतल्या होत्या. पानशेत प्रलयातील पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया यानिमित्ताने पूर्ण झाली याचा मला विशेष आनंद होत आहे. असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.