Mumbai : परप्रांतीय मजुरांना गावी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

एमपीसी न्यूज : राज्यात राहणाऱ्या आणि परराज्यातील मूळ गावी जाणाऱ्या मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र गरज नाही. अशा प्रमाणपत्रांशिवाय हे मजूर आपल्या गावी जाऊ शकतील, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज ( गुरूवारी) सांगितले.

आरोग्य मंत्री टोपे यांनी आज फेसबूक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी परराज्यातील मूळ गावी जाणाऱ्या मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याआधी परराज्यात आपल्या मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या मजुराला डॉक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे होते.  त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हजारो मजुरांच्या दवाखाने आणि रुग्णालयाबाहेर रांगा लागत आहेत. आता त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय गावी जाता येणार आहे.

त्यांचे आता केवळ थर्मल चेकिंग केले जाईल. तसेच त्यांना ताप येत आहे का याची तपासणी केली जाईल. ताप नसेल तर त्यांना तात्काळ गावी जाण्यास मुभा देण्यात येणार आहे.  परराज्यात जाणाऱ्या मजुरांसाठी रेल्वेच्या फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बसेसची व्यवस्था करून मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहे. संसर्ग टाळण्यासाठी नियामावली तयार करण्यात येणार आहे. त्याचे काटेकोर पालन करणे प्रत्येकावर बंधनकारक असेल, असेही मंत्री टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, प्रवास सुरु करण्यापूर्वी मजूर आणि कामगारांची डिजिटल थर्मोमीटरच्या साहाय्याने स्क्रीनिंग होणार आहे. यासाठी या प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सरकार किंवा महापालिकेच्या डॉक्टरांची त्याठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर कोणताही ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं नसलेल्यांना प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.