Mumbai: राज्याचे माजी मुख्य सचिव राम प्रधान यांचे निधन

एमपीसी न्यूज – अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृह सचिव आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (वय 92) यांचे आज (शुक्रवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.

राम प्रधान यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राम प्रधान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दु:ख

राम प्रधान हे महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुभवी मुत्सद्दी अधिकारी, विचारवंत तसेच भाष्यकार होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून ते राज्यातील तसेच देशातील अनेक महत्त्वपुर्ण सामाजिक व राजकीय घडामोडींचे साक्षीदार होते. मुख्य सचिव तसेच केंद्रीय गृह सचिव या नात्याने त्यांनी देशापुढील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपले घटनात्मक दायित्व जबाबदारीने पार पाडले. प्रशासकीय चौकटीत राहून तसेच त्यानंतर एक विचारवंत म्हणून राम प्रधान यांनी केलेले राष्ट्रकार्य निरंतर स्मरणात राहील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

प्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्टी देणारा कर्तृत्ववान अधिकारी गमावला- मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि प्रशासकीय व्यवस्थेला सकारात्मक दृष्‍टी देणाऱ्या एका कर्तृत्ववान अधिकाऱ्याला आपण मुकलो आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव तसेच ज्येष्ठ सनदी अधिकारी राम प्रधान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, श्री. प्रधान यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीत अनेक विभागात काम केले. रचनात्मक आणि विधायक कामाला आपल्या अनुभवांची जोड देतांना राम प्रधान यांनी राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरचे अनेक प्रश्न संयमाने, मुत्सदेगिरीने आणि अभ्यासपूर्वक हाताळले. अनेक विषयांचा सखोल अभ्यास हे त्यांचे वैशिष्ट्य होते. प्रशासकीय अधिकारी ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असा त्यांचा कार्य प्रवास नेहमीच सर्वांसाठी प्रोत्साहन देणारा राहिला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राम प्रधान यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

राम प्रधान साहेबांच्या निधनानं राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान देणारं व्यासंगी व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट अधिकारी, सामाजिक प्रश्नांचे जाणकार, सचोटीचं व्यक्तिमत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे खाजगी सचिव म्हणून राम प्रधान साहेबांनी काम केलं होतं. देशासमोरच्या अनेक जटील प्रश्नांवर तोडगा काढण्यात, उपाय सुचवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि नेहरु सायन्स सेंटरसारख्या महत्वाच्या संस्थांचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केलं. राज्याच्या, देशाच्या प्रश्नांची जाण असलेल्या राम प्रधान साहेबांचं निधन ही राज्याची फार मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.