Mumbai : घरमालक मिर्झा आणि भाडेकरु बांकेची नोकझोक असलेला ‘गुलाबो सिताबो’चा मजेशीर ट्रेलर

Mumbai : Funny trailer of 'Gulabo Sitabo' starring landlord Mirza and tenant Baankey

एमपीसी न्यूज – असं म्हटलं जातं की चांगला चित्रपट जमण्यासाठी त्यात हिरॉईनचे लटके झटके आवश्यक असतात. पण अशा प्रकारची कोणतीही हिरॉईन नसलेला आणि दोन हिरोंची नोकझोक असलेला अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुरानाची अनोखी जुगलबंदी असलेला ‘गुलाबो सिताबो’ या भन्नाट नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि नव्या दमाचा अभिनेता आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपट १२ जूनला अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवरुन प्रदर्शित होणार आहे. सुजित सरकार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पटकथा जुही चतुर्वेदी यांची असून संगीत शंतनू मोईत्रा यांचे आहे.

‘पाहा मिर्झा आणि बंकी यांच्या भन्नाट जोडीला’, असं म्हणत अॅमेझॉन प्राईमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्रेलर विषयी माहिती देण्यात आली आहे. या ट्रेलरमध्ये अमिताभ आणि आयुषमानची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. घरमालक मिर्जा आणि भाडेकरु बांके यांच्यातील घर सोडण्यावरुन रंगलेले युद्ध मजेदार स्वरुपात रंगवण्यात आले आहे. मिर्जाला बांकेने घर सोडायला हवे असते. म्हणून मग तो काहीतरी शक्कल काढतो आणि त्यावर बांके काहीतरी तिकडम लढवतो. अखेरीस या सामन्यात कोण जिंकते आणि दोघांचे काय होते यावर हा चित्रपट आधारलेला आहे.

‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट गेल्या दिवसांत प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे सिनेमागृहांचे मालक आणि चित्रपट निर्माते यांच्यात एक अनोखे व्दंद निर्माण झाले. त्यांनी चित्रपट OTTवर येण्यास आपला विरोध दर्शवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.