Mumbai : तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या ‘गौरी -द अर्ज टू फ्लाय’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

एमपीसी न्यूज- तृत्तीयपंथी आणि वेश्या व्यावसायिक मुलांसाठी सामाजिक काम करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांचा जीवन प्रवास उलगडणारे ‘गौरी -द अर्ज टू फ्लाय’ पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. ‘राईट क्लीक पब्लिकेशन्स’ द्वारे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण नुकतेच झाले.

वेश्या व्यावसायिक महिलेची मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणाऱ्या प्रथम तृतीयपंथीय ठरलेल्या गौरी सावंत यांचा जीवनप्रवास, संघर्ष, शोध पुस्तकात मांडला आहे. त्यांच्या ‘नानी का घर’ या स्वयंसेवी संस्थेतील त्यांच्या ‘नानी’ या व्यक्तिरेखेचे पैलू समाजापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. २००१ मध्ये गायत्रीला दत्तक घेतल्यानंतर ‘नानी का घर’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सेक्स वर्कर्स, जन्मतः तुतीयपंथी असणाऱ्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे, त्यांना शिक्षण देणे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे काम गौरी सावंत करत आहेत.

गौरी सावंत यांना आलेल्या समस्या, आव्हाने व त्यांनी दिलेला त्यासाठीचा लढा याची माहिती पुस्तकाद्वारे उलगडणार आहे. पुस्तकाची संकल्पना रचना शाह यांची आहे. या पुस्तकाचे प्रकाशन येत्या 12 मे 2019 ला मातृदिनी होणार असल्याची माहिती, युवा लेखक रिदम वाघोलीकर यांनी प्रेस क्लब, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  रिदम वाघोलीकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

“एच आय व्ही झालेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या 5 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले आणि मातृत्वाचा प्रवास सुरु झाला. गायत्रीमुळे मला आईपण मिळाले. आणि ‘नानी का घर’ स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते पुढे कार्यरत आहे’, असे तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सावंत म्हणाल्या, “रिदम वाघोलीकर यांनी हे पुस्तक लिहुन माझी इच्छापूर्ती केली आहे. पुस्तकामुळे समाजात उपेक्षित राहिलेल्या माझ्यासारख्या समदुःखी तृतीयपंथी, वेश्या व्यावसायिक आणि जन्मतः तृतीयपंथी असणाऱ्या मुलांना (हर्माफ्रोडाईट) न्याय मिळणार आहे. मला अतिशय आनंद वाटतो की, तृतीयपंथी समाजाला डावलले जाते अशी समाज प्रवृत्ती बदलण्यास या पुस्तकाच्या माध्यमातून मदत होणार आहे”

“आम्हाला आशा आहे की हे पुस्तक लाखो लोकांपर्यंत पोहोचेल. पुस्तकाद्वारे जो गौरी आणि आमच्या कुटुंबाला मदतीचा हात देईल आणि प्रवासाचा भाग बनू शकेल असे एकत्र येण्यास मदत होऊ शकेल”असे रिदम वाघोलीकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.