Mumbai : आनंदाची बातमी – पुढील पाच वर्षांसाठी वीजदर 10 ते 15 टक्क्यांनी कमी होणार

राज्य वीज नियामक आयोगाचे महावितरणला आदेश

एमपीसी – घरगुती, औद्योगिक आणि शेती वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील विजेचे दर कमी करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला दिले आहेत. या आदेशानुसार विजेचे दर 10 ते 15 टक्क्यांनी कमी होणार आहेत. हे बदल एप्रिल 2020 पासून लागू असणार आहेत.

मुंबईमध्ये तीन कंपन्या वीजपुरवठा करतात. त्यातील बेस्ट (बॉम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय ट्रान्सपोर्ट) ला, घरगुती दर दीड ते दोन टक्के, औद्योगिक सात टक्के, व्यापार आठ टक्के वीजदर कमी करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. टाटा आणि अदानी या दोन्ही कंपन्यांनी घरगुती 11 टक्के, औद्योगिक 19 टक्के आणि व्यापारी 19 टक्के दर कमी करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

उर्वरित महाराष्ट्रात महावितरण हे एकच एकक वीजपुरवठा करीत आहे. घरगुती वीज ग्राहकांना पाच टक्के वीज दर कमी होतील. उद्योग क्षेत्रातील दहा ते अकरा टक्के आणि व्यापार क्षेत्रातील वीजदर अकरा ते बारा टक्क्यांनी कमी होणार आहेत. शेती क्षेत्राचे एक टक्क्याने वीजदर कमी होणार आहेत.

“हे दर पुढील तीन ते पाच वर्ष बदलणार नाहीत. मागील दीड ते दोन वर्षांपासून आर्थिक मंदी सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील पुढील तीन महिने वसुली स्थागिक करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरातील दुकाने आणि उद्योग बंद झाल्याने ही सूट देण्यात येणार आहे. हे दर कमी केल्याने शासनाच्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारचा अधिभार पडणार नाही.” आनंद कुलकर्णी – अध्यक्ष, राज्य वीज नियामक आयोग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.