Mumbai ; शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाही, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी अनावश्यक गर्दी तसेच प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मंगळवारी (दि. 17) मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले महत्वपूर्ण निर्णय –

# मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल.

# सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनाने मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितले आहे.

# मुंबई शहरातील विशेषत: क्रॉफर्ड मार्केट परिसरातील पक्षी व प्राण्यांशी संबंधित दुकाने संसर्गाचा धोका गृहित धरुन बंद करण्यात येतील. मात्र, भाजीपाला दुकाने सुरुच राहतील.

# कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत असून, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धती मान्य करण्यात आली आहे

# रेल्वे, बसेस ही सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येणार नाही. मात्र, आवश्यक असेल तेव्हाच नागरीकांनी प्रवास करावा. परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून आवश्यकता भासल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल.

# औषधे, बँका, संस्थांचे व्यवस्थापन प्रमुख आणि आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी देखील सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून औषधे, मास्क, सॅनिटायझर, व्हेन्टीलेटर पुरविणार.

# गरज असल्यास व्हेंटिलेटर आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारातून खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनाला अधिकार देण्यात आले.
# कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता गर्दी कमी करणे हा प्रभावी उपाय असून त्यासाठी आवश्यक तेवढा प्रवास करावा, असे आवाहन सरकारच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.