Mumbai: यापुढे खासगी रुग्णालयांसाठी सरकारी ‘रेट कार्ड’! रुग्णांची लूट थांबविण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय

Mumbai: Government 'rate card' for private hospitals from now on! State government decides to stop loot of patients कोरोना रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड घेणार ताब्यात

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटात वाटेल तेवढे बिल आकारून खासगी रुग्णालये रुग्णांची अक्षरशः लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य शासनाने खासगी रुग्णालयांसाठी रुग्णसेवेचे दरपत्रकच जाहीर केले आहे. शासनाने जाहीर केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिक रक्कम आकारण्यास रुग्णालयांना प्रतिबंध केला आहे.  कोरोनाच्या संकटात खासगी रुग्णालयातल्या 80 टक्के खाटा राज्य सरकार ताब्यात घेणार आहे.

आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी या बाबत काल (शुक्रवारी) परिपत्रक जारी केले आहे.  रुग्णांची लूट थांबवण्यासाठी खासगी रुग्णालयांना शुल्कदर निश्चित करुन देण्यात आले आहे. कोरोनाच्या लढाईत खाजगी रुग्णालयांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुन्हा एकदा सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. सहकार्याऐवजी रुग्णालयांकडून टाळाटाळ करण् समोर आलं. म्हणून सरकारला हे कठोर पाऊल उचलावं लागलं आहे. 31 ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे.

निर्णयानुसार वॉर्ड, विलगीकरण बेडसाठी 4,000 रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाणार आहे. तसंच व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या अतिदक्षता विभागातील बेडसाठी 7,500 तर व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या अतिदक्षता विभागातील बेडसाठी 9,000 रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय राज्य सरकारने इतर 270 प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचाही समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकते.

प्रत्येक शस्त्रक्रियेचे दर ठरवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांना यापुढे यापेक्षा अधिक दर आकारता येणार नाही, असे शासकीय आदेशात म्हटले आहे.

अँजिओग्राफी – 12 हजार
अँजिओप्लास्टी – 1.2 लाख
नैसर्गिक प्रसूतीसाठी – 75 हजार
सिझर प्रसूती – 86, 250
डायलिसिस- 2500
गुडघ्याची शस्त्रक्रिया- नी रिप्लेसमेंट – 1 लाख 60 हजार
व्हॉल्व रिप्लेसमेंट- 3 लाख 23 हजार
पर्मनंट पेसमेकर – 1 लाख 38 हजार
मोतिबिंदू शस्त्रक्रिया- 25 हजार

सरकारने ठरवलेल्या शुल्कामध्ये औषधे, डॉक्टर, परिचारिका यांची फी, जेवण आणि बेडचे भाडे यांचा समावेश आहे. कोव्हिड चाचणी, पीपीई किट, एमआरआय, सीटी स्कॅन आणि काही महागड्या औषधांचे वेगळे पैसे आकारले जातील. यापूर्वी खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर वापरणाऱ्या कोव्हिड-19 च्या रुग्णांकडून 40 ते 50 हजार रुपये घेतले जात होते. नव्या दरांमुळे सुमारे 82 टक्के खर्च कमी होणार आहे. पीपीई किट, पेसमेकर, इंट्राऑक्युलर लेन्स, स्टेंट, कॅथेटर, बलून, मेडिकल इंप्लांट यांचे दर प्रत्यक्ष किमतीच्या 10 टक्क्यांहून अधिक लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.