Mumbai: रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब या औषधांच्या वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक – डॉ. राजेंद्र शिंगणे

Guidance on the use of remedi and toxilizumab is required - Dr. Rajendra Shingane : रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसिविर [Remdesivir 100 mg Inj] व टोसिलिझुमॅब  (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. या औषधांच्या वापराबाबत कोविड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे, असे मत, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे.

या आशयाची मागणी करणारे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहीले आहे. आपल्या पत्रात डॉ. शिंगणे यांनी लिहीले आहे, कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर आणि टोसिलिझुमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे.

या औषधाची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्याने तुटवडा भासत आहे. रुग्णालयांकडून दाखल असलेल्या रुग्णांसाठी या दोन्ही औषधांची मागणी केली जाते आहे.

काही ठिकाणी ही औषधे जास्तप्रमाणात प्रिस्क्राईब केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

कोविड रिपोर्ट येण्यापुर्वी किंवा रिपोर्ट आल्यानंतर पहिल्या दिवशीच ही औषधे प्रिस्क्राईब केलेली किंवा एकाच प्रिस्क्रीपशन वर दोन्ही औषधे मागवलेली असल्याची माहिती मिळाली आहे.

कमी पुरवठ्यामुळे औषध रुग्णाला वेळेवर मिळणार नाही या भीतीपोटी अगोदरच औषधाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबतची जनतेच्या मनातील भीती व संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोविड टास्क फोर्समार्फत रेमडेसिविर व टोसिलिझुमॅब ही औषधे रुग्णाचा कोविड  पॉझिटिव्ह  रिपोर्ट आल्यानंतर कोणत्या दिवशी व कोणत्या परिस्थितीत द्यावीत.

तसेच ही दोन्ही औषधे एकाच वेळी रुग्णांना देता येतात का, याबाबत राज्यातील जनतेला मार्गदर्शन व्हावे यासाठी कोविड टास्क फोर्सला उचित निर्देश देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर व टोसिलिझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अन्न व औषध प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यभरात कारवाया वाढविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.