Mumbai: ‘मी इथं बसलोय, सरकार पाडून दाखवा’, मुख्यमंत्री ठाकरे यांचे विरोधकांना थेट आव्हान

Mumbai: 'I am sitting here, overthrow the government', Chief Minister Thackeray's direct challenge to the opposition 'सामना'साठी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा प्रोमो व्हायरल, 25 आणि 26 जुलैला मुलाखतीचे प्रसारण

एमपीसी न्यूज – ‘ मी इथं बसलेलो आहे, माझी मुलाखत सुरु आहे, तोवर सरकार पाडून दाखवा, असे थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना दिले आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ही मुलाखत 25 व 26 जुलैला ‘सामना डॉट कॉम’ या संकेत स्थळावर प्रसारित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांना देखील त्याबाबत उत्सुकता आहे.

महाविकास आघाडी सरकारवर तीन चाकी सरकार आहे असा आरोप होत आहे, असा सवाल राऊत यांनी केला असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, केंद्रात किती साखळ्या आहेत, याचाही विचार करा. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला शिवसेना पसरवायची आहे? आत्मनिर्भर शिवसेना आपल्याला करायची आहे? असं राऊत यांनी विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो.

आज तुम्हाला चीन नको आहे, मात्र पुढे जाऊन कालांतराने भारत-चिनी भाईभाई होणार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं नाही. हा केवळ योगायोग आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून सर्व सामन्यांना पडलेले प्रश्न आणि त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेली दिलखुलास उत्तरे या मुलाखतीचे वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्री पदाचा अनुभव, राम मंदिर, भाजपसोबत संबंध, कोरोना, लॉकडाऊन, महाविकास आघाडीतला असमन्वय, सत्तापालट या विषयांवर उद्धव ठाकरे यांना थेट प्रश्न विचारण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.