Mumbai : मला पहिला चेंडू खेळायला आवडत नाही ; ‘गब्बर’चे ‘हिटमॅन’ला प्रत्युत्तर

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याने शिखर धवनला पहिला चेंडू का खेळत नाही, यावरून त्याला ‘इडियट’ असे संबोधित केले होते. त्यावरून आता शिखर धवनने रोहित शर्माला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित शर्माने डेव्हिड वॉर्नर याच्याबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान धवनवर आरोप केला होता की, तो केव्हाच पहिला चेंडू खेळत नाही. तर वॉर्नरने म्हटले होते की, धवन नेहमी शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतो. त्यामुळे आता धवनने इरफान पठाणबरोबर चर्चा करताना रोहितच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

धवन म्हणाला, मला पहिला चेंडू खेळायला आवडत नाही. जर माझ्या बरोबर खेळणारा दुसरा खेळाडू युवा असेल तर मी त्याच्याशी चर्चा करतो. जर त्याला खेळता आले नाही, तर मी नक्कीच पहिल्यांदा फलंदाजी करेन असे तो म्हणाला.

2013 मध्ये मी भारतीय संघात पुनरागमन केले होते आणि रोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून पहिला सामना खेळला होता. त्यावेळी रोहितने प्रथम फलंदाजी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत तोच प्रथम फलंदाजी करत असल्याचेही धवन म्हणाला.

शिखर धवन वॉर्नरच्या आरोपांची उत्तरे देताना पुढे म्हणाला, वॉर्नर म्हणत होता की, मी नेहमी शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतो. परंतु, मी याबद्दल सहमत नाही. मी असे करत नसल्याचे स्पष्टीकरण धवनने दिले आहे.

भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील काही गोष्टींचा खुलासा करताना धवन म्हणाला, रोहित आणि मोहम्मद शमी नेहमी ड्रेसिंग रूममध्ये खूप कूल राहतात, तर जसप्रीत बुमराह नेहमी गंभीर असतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे आयपीएल सहीत इतर सर्व सामने अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी शेअर करताना दिसून येत आहेत.

दरम्यान, विविध गुपीत आणि रहस्यांचा खुलासा हे खेळाडू करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.