IPL 2021 : मुंबई इंडियन्स जिंकूनही आयपीएल 2021 मधून बाहेर

हैदराबादवर मिळवला 42 धावांनी विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : आयपीएल 2021 चा 55 वा सामना अबुधाबी येथे झाला, ज्यात मुंबईने हैदराबाद संघाला 42 धावांनी पराभूत करून शेवट गोड केला मात्र सनरायजर्सच्या झुंजार खेळीमुळे मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला.

 सर्वस्व पणाला लागलेले असल्याने मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना फारच महत्वाचा होता, त्यात रोहीत शर्माने नाणेफेक जिंकली आणि क्षणात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहित सोबत ईशान किशन सलामीला आला आणि पहिल्याच षटकापासून त्याने तुफानी हल्ला सुरू केला. मैदानाच्या चारही बाजूला धावा काढणे त्याने चालू केले.

एरव्ही आक्रमक असलेला रोहीत शर्मा आज मात्र ईशानचा मूड आणि फॉर्म बघून त्यालाच जास्तीत जास्त खेळायला संधी देत होता. ईशानला मागच्या सामन्यात सापडलेला सूर आजही कायम होता आणि काय खेळला तो. जबरदस्त एकदम जबरदस्त फलंदाजी केली त्यांने. आयपीएल मधले सर्वात वेगवान अर्धशतक करण्यात त्याने चौथा नंबर पटकावला.

केवळ 16 चेंडूत ईशानने आपले आकर्षक आणि आक्रमक अर्धशतक पुर्ण केले, या धडाक्यामुळे मुंबईने पहिल्या पॉवरप्ले मध्ये 80 धावा चोपल्या. ज्यात रोहीतचा वाटा केवळ अठरा धावांचा होता. रोहितला रशीद खानने बाद केले. रोहीतच्या जागी आलेला हार्दिक पंड्या आज विशेष काही करू शकला नाही आणि केवळ दहा धावा काढून होल्डरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

दुसऱ्या बाजूने ईशान किशनने आपल्या अर्धशतकी खेळीनंतरही धडाका चालूच ठेवला होता, पण याच नादात तो उमरान मलीकच्या गोलंदाजीवर साहाकडे झेल देवून बाद झाला. त्याने केवळ 32 चेंडूत घणाघाती 84 धावा चोपल्या ज्यात अकरा चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार होते, त्याच्या या देखण्या खेळीचा अंत झाल्यावर संपूर्ण स्टेडियमवरील प्रेक्षकांनी त्याला उभे राहून दाद दिली. तो बाद झाला तेव्हा मुंबई इंडियन्सच्या केवळ 9 षटकात 123 धावा होत्या.

त्याच खेळीला पुढे चालू ठेवले ते सुर्यकुमार यादवने. दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने एकेक धुरंदर धारातीर्थी पडत असतानाही यादवाचा कुमार मात्र सुर्यासारखा तळपत होता, त्याच्या धडाक्याने मुंबई इंडियन्सने 20 षटकात तब्बल 235 धावाचे विशाल लक्ष हैदराबादपुढे ठेवले. सुर्यकुमार यादवने 40 चेंडूत 82 धावा ठोकताना 13 चौकार आणि तीन षटकार मारले. हैदराबादचे सर्वच गोलंदाज या वादळात कोलमडून गेले तरी होल्डरने चार गडी बाद केले.

धावा भरपूर केल्या असल्या तरी प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी हैदराबाद संघाला 170 धावांनी पराभूत करणे गरजेचे होते.पण जेसन रॉय  आणि अभिषेक शर्माने पहिल्या गड्यासाठी 64 धावा काढून मुंबईचे स्वप्न भंग केले अन केकेआरची लॉटरी लागली. त्यामुळे एकप्रकारे या सामन्यातली चुरस निघूनच गेली.

अभिषेक शर्माने आधी गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आणि नंतर फलंदाजी करताना सुद्धा 16 चेंडूत 33 धावा काढून मुंबईला निराश केले. जेसन रॉय 21 चेंडूत वेगवान  34 धावा काढून बाद झाला.

त्यानंतर आलेल्या मनिष पांडेने लढाई चालूच ठेवताना चांगली फलंदाजी केली. त्याला प्रियम गर्गने बऱ्यापैकी साथ दिली. मात्र इतर फलंदाज विशेष कामगीरी करू न शकल्याने मनीष पांडेची झुंजार लढत अपयशी ठरली असली तरी त्याने आणि त्याच्या संघाने जोरदार लढत देत मुंबई संघाला स्पर्धेबाहेर काढून कोलकाता संघाला प्ले ऑफ साठी पात्र होण्यात एकप्रकारे सहकार्यच केले असे म्हटल्यास त्यात गैर काहीही ठरणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.