IPL Treat : मुंबई इंडियन्सने हारलेला सामना रोमांचकरित्या जिंकून क्रिकेट रसिकांना दिली जबरदस्त मेजवाणी

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी ) आयपीएल मधील सर्वात यशस्वी पण सुरुवातीला धक्का स्टार्ट असणारी मुंबई इंडियन्स टीम आजही आपल्या या लौकिकाला जागतेय की असे वाटत असतानाच त्यांची गाडी बंबया भाषेत चक्क पटरीवर आली, नुसती आलीच नाही तर त्यांनी अत्यंत झुंजार,विजिगीशु वृत्तीचे प्रदर्शन केले, आणि हारलेला सामना रोमांचकरित्या जिंकून क्रिकेट रसिकांना एक जबरदस्त सामना बघण्याचा आनंदही दिला. 

कोलकाता संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनने नाणेफेक जिंकून अपेक्षितरित्या गोलंदाजी स्विकारली आणि या स्पर्धेतला पहिला सामना खेळणाऱ्या डिकॉक बरोबर कर्णधार  रोहीत शर्मा सलामीला आला मात्र डीकॉक आज त्याच्या लौकिकाला जराही जागला नाही, पण यानंतर आलेल्या मुंबई इंडियन्सच्या सर्वात भरवशाचा मानला जाणारा सुर्यकुमार यादवने शब्दशः सुर्यासारखे तळपत धुवांधार फलंदाजी करताना मुंबई इंडीयन्सला मोठ्या धावसंख्येच्या आमीष दाखवले मात्र याच फटकेबाजीच्या नादात त्याने विकेट गमावली आणि पाठोपाठ ईशान किशन सुद्धा लगेचच तंबूत परतला.

पण याने काही मुंबई इंडियन्सला लगेच धडकी भरणार नव्हती कारण या टीम मध्ये एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज आहेत,किंग पोलार्ड, पंड्या बंधू असे खंदे फलंदाज अजून बाकी होते आणि त्यात अजुन खास म्हणजे रोहीत सुद्धा आज जम धरुन खेळतोय असे वाटत असतानाच घात झाला आणि रोहीत आपल्या संघाची डुबती नैय्या बीच मंझधार मध्ये सोडून तंबूत परतला आणि उरलेला घाव आंद्रे रसेलने घालत अवघ्या दोनच षटकात एक दोन नव्हे तर तब्बल पाच बळी घेत मुंबई इंडियन्सचे कम्बरडे मोडत बऱ्यापैकी धावा होतील असे वाटत असतानाच अवघ्या 152 धावात रोखले,

 या किरकोळ वाटणाऱ्या धावसंख्येचा पाठलाग करताना नितीश राणा आणि शुभमन गिलने धडाकेबाज सलामी देताना मुंबई इंडियन्सच्या उरल्यासुरल्या  आशेला सुद्धा सुरंग लावून दिला आणि सुंदर सुरुवातही केली मात्र याच आक्रमकतेच्या नादात शुभमन गील  तंबूत परतला पण नीतीश राणाने मात्र जम बसल्यावर सुंदर आक्रमकता आणि संयम याची सांगड घालतात अर्धशतक करून संघाला विजयाच्या समीप आणले

,कोलकाता संघ अगदी सहज विजयाची चव चाखेल असे वाटत असतानाच , कोलकाता संघाची मधली फळी मुंबई सारखीच कोसळली ,कर्णधार मॉर्गन,त्रिपाठी, शकीब बाद झाले आणि लगेचच नितीश राणा सुद्धा 57 धावा करून बाद झाला ,यातल्या पाच पैकी चार बळी लेगब्रेक गोलंदाज राहुल चाहरने घेतल्या  शेवटच्या दोन षटकात 19 धावांची गरज असताना मस्सल रसेल आणि दिनेश कार्तिक या अनुभवी जोडीने  तग धरला तर सहज विजय मिळेल असे वाटत असतानाच

शेवटी शेवटी फलंदाजी करणे अवघड होतं गेले आणि शेवटच्या षटकात पंधरा धावा करायचे लक्ष असताना समोर गोलंदाजीसाठी होता जगातला सर्वात अचूक म्हणून ओळखला जाणारा बोल्ट होता पहिल्या दोन चेंडूत दोनच धावा निघाल्यावर मात्र एकतर्फी वाटणारी match अचानकपणे रोमांचक व्हायला लागली आणि  आपल्या अनुभवाच्या जोरावर बोल्ट ने चमत्कार करत सामना मुंबई इंडियन्स कडे झुकवत दोन चेंडूत दोन बळी मिळवले आणि आयपीएल मधली थरारकता क्रिकेट विश्वाला दाखवून देत कोलकाता संघाच्या घशामधला घास काढत

एक अविस्मरणीय विजय मिळवून आपल्या संघाला विजयपथावर आणून ठेवले आणि एक अविस्मरणीय सोबतच अविश्वसनीय असा विजय संघाला मिळवून दिला,बोल्ट इतकीच महत्वाची कामगिरी राहुल चाहर ने सुद्धा केली,त्याच वेळी सामन्यातले अत्यंत महत्वपूर्ण असे 19 वे षटक टाकताना बुमराहने केवळ चारच धावा देत आपल्या संघाला सामना आपण जिंकू शकूत अशी आशा दाखवली

आणि त्यावर कळस चढवला तो बोल्टने मुंबई इंडीयन्सची गाडी पटरीवर आली असतानाच कोलकाता संघाला मात्र आपल्या हातातला सामना गमावण्याची हुरहूर लागली असणार हे नक्की,तसेही आयपीएल मध्ये मात्र मुंबई इंडियन्स नेहमीच कोलकाता संघावर वरचढ आहे याची प्रचिती पुन्हा एकदा सर्वाना आली, क्रिकेट रसिकांना मात्र एक थरारक सामना घररबसल्या बघण्याचा आनंद दोन्ही संघांनी दिला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.