Mumbai: इरफान सय्यद यांनी घेतली कामगारमंत्री जयंत पाटील यांची भेट

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, शिवसेना सहसंपर्कप्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्याचे अर्थ, कामगारमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. तसेच सरकारने कामगारांच्या हिताचे निर्णय घेऊन असंघटित कामगार, बांधकाम,  माथाडी,  मापाडी कामगारांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने न्याय देऊन यांच्या चेह-यावर हास्य फुलववावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापनेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नऊ वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेले विधिमंडळातील अभ्यासू सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात कामगार, अर्थमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांची इरफान सय्यद यांनी आज भेट घेतली.

असंघटित क्षेत्रात काम  करीत असलेले माथाडी, बांधकाम कामगार,  जनरल कामगार यांना भेडसावत असलेल्या प्रश्नांवर चर्चा केली. या कामगारांच्या प्रश्नांवर आपल्या सरकारच्यावतीने योग्य निर्णय घ्यावेत. बंद पडलेल्या योजना पूर्ववत सुरू कराव्यात. असंघटित  बांधकाम,  माथाडी, मापाडी कामगारांना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने न्याय देऊन यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम करावे, अशी विनंती सय्यद यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.