Mumbai : मुंबई आणि पुण्यातून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत जाण्यास अथवा येण्यास परवानगी नाही

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात विशेषता पुणे-मुंबई येथे अडकलेल्या लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने याबाबत खुलासा करत सविस्तर माहिती दिली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन माहितीनुसार मुंबई आणि पुण्यातून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत जाण्यास अथवा येण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर आणखी काही महत्वाच्या बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

1) पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर, नागपूर आदी) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहेत.

2) दरम्यान, असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाकारली आहे.

3) मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर म्हणजे इतर राज्यांमध्ये (विशेषत: कामगार, मजुरांना व विद्यार्थ्यांना) जाण्याची परवानगी असणार आहे.

4) याबाबत परवानगी मिळवण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज करता येणार आहे. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

देशात लाॅकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या यात्रेकरू, विद्यार्थी व मजुरांना आपल्या गावी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असल्यामुळे येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या मूळ गावी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. मात्र, परराज्यातील नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून पुणे व मुंबईमध्ये येण्याची सुद्धा परवानगी नाकारण्यात आली आहे.

शासनाने अर्धवट किंवा अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये तसेच कोणीही कुठेही धावाधाव करू नये व राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.