Mumbai: आयटीआय प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

ITI admission process from 1st August; Information of Skill Development Minister Nawab Malik : आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीयभूत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून दि.  1 ऑगस्ट 2020  पासून प्रवेश अर्ज ऑनलाईन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

तथापी, आयटीआय महाविद्यालये कधी सुरु होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासनाच्या नियमास अनुसरुन नंतर माहिती जाहीर करण्यात येईल. सध्या फक्त प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान शैक्षणिक पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अर्हता धारण करणारे 14 वर्षावरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली नाही, जेणेकरुन वयाच्या कोणत्याही टप्प्यावर इच्छूक उमेदवार प्रवेश घेऊ शकतात.

यंदा प्रवेश अर्ज व नोंदणी शुल्क भरणे, आयटीआय केंद्रांची निवड करणे, प्रवेश अर्जात सुधारणा, दुरुस्ती करणे, हरकती नोंदविणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांना ऑनलाईन करता येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी गर्दी होऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

दिड लाखाहून अधिक प्रवेशक्षमता

राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे. 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे.

आदिवासी भागात आदिवासींसाठी 61 संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी 4 उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी 2 स्वतंत्र संस्था व 43 शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी 15 तर 28 आदिवासी (आश्रमशाळा) आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.

याचबरोबर राज्यात 569 खाजगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 53 हजार 272 आहे. शासकीय आणि खाजगी 986 आयटीआय असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता 1 लाख 45 हजार 828 विद्यार्थी इतकी आहे.

प्रादेशिक विभागनिहाय शासकीय व खाजगी संस्थांची संख्या व प्रवेशक्षमता पुढीलप्रमाणे आहे. अमरावती – 90 संस्था आणि 17 हजार 984 प्रवेशक्षमता, औरंगाबाद – 133 संस्था आणि 19  हजार 264 प्रवेशक्षमता, मुंबई – 108  संस्था आणि 20  हजार 124  प्रवेशक्षमता, नागपूर – 241  संस्था आणि 28 हजार 136  प्रवेशक्षमता, नाशिक– 218 संस्था आणि 29 हजार 500 प्रवेशक्षमता, पुणे – 196 संस्था आणि 30 हजार 820 प्रवेशक्षमता.

वेबसाईटवर इत्यंभूत माहिती

आयटीआय प्रवेशासंबंधित नियम, प्रवेशासाठी उपलब्ध जागा, आवश्यक दस्तऐवजांची माहिती व संपूर्ण प्रवेश कार्यपद्धती, याबाबत विस्तृत माहिती समाविष्ट असलेली माहिती पुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक, शासकीय आयटीआय मधील वसतीगृहांची उपलब्धता, मागील तीन वर्षात प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांना व्यवसाय अभ्यासक्रम व संस्थानिहाय इयत्ता दहावीमध्ये प्राप्त झालेले प्रवर्गनिहाय महत्तम व किमान गुण, दिव्यांग विद्यार्थ्यांची व्यवसाय अभ्यासक्रम निहाय पात्रता, जिल्हानिहाय कौशल्याचा अभाव दर्शविणारा अहवाल (Skill Gap Study Report), व्यवसाय प्रशिक्षण पुतिपुर्ती योजनेची माहिती व कार्यपद्धती इत्यादींबाबतची माहिती https://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

  प्रवेश नियमावली काळजीपूर्वक वाचून प्रवेशासाठी अर्ज करावा.

आयटीआयविषयी अधिक माहिती

इयत्ता दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता बारावीची समकक्षता देण्यात येते.

तसेच इयत्ता दहावी अनुत्तीर्ण उमेदवारांनी आयटीआयमधून 2 वर्षे कालावधीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्धारित केलेल्या 2 भाषा विषयांची परिक्षा उत्तीर्ण केल्यास त्या उमेदवारास इयत्ता दहावीची समकक्षता देण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.