Mumbai ITI News: आयटीआय प्रवेश अर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती. : Extension till 31st August for ITI admission application

एमपीसी न्यूज – चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

ही मुदत उद्या 21 ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ देण्यात येत आहे.

सन 2015 ते 2019 या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी 2.25 पट अर्ज प्राप्त झाले होते. तथापि, चालू वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत उपलब्ध जागांच्या फक्त 1.45 पट अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्यात काही भागात स्थानिक लॉकडाऊन असल्याने प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. दुर्गम व ग्रामीण भागात इंटरनेटच्या काही अडचणी येत आहेत.

तसेच एकूण उपलब्ध जागांच्या तुलनेत प्राप्त प्रवेश अर्ज अधिक असले तरी काही विशिष्ट व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी किंवा काही तालुक्यांत उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी विकल्प प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले आहे.

शिवाय नियमित प्रशिक्षण सुरू होण्यासाठी अजून अवकाश आहे. त्यामुळे कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री मलिक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.