Mumbai : ‘रॅप साँग’मधून जितेंद्र जोशीचा पोलिसांना सलाम (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज : चतुरस्त्र मराठी अभिनेता जितेंद्र जोशी म्हणजे त्याच्या चाहत्यांचा लाडका जितू. त्याने करोनाशी लढा देणाऱ्या पोलिसांसाठी एक ‘रॅप साँग’ गायलं आहे. सध्या हे ‘रॅप साँग’ सोशल मीडियावर सध्या ट्रेण्ड होत आहे.

एक अत्यंत संवेदनशील कवी म्हणून जीतूची वेगळी ओळख रसिकांमध्ये आहे. त्याने वेगवेगळ्या धाटणीच्या कविता, गाणी लिहिली आहेत. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण गाणे म्हणजे ‘कोंबडी पळाली’. अनेकदा सामाजिक विषयांवर तो मोकळेपणाने व्यक्त होतो.  आता त्याने पोलिसांसाठी एक दमदार ‘रॅप’ लिहिलं आहे आणि म्हटलंसुद्धा आहे.

‘थोडी इज्जत दिखा, एक सॅल्यूट तो मार…’ असं तो या रॅपमध्ये म्हणतोय. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पोलीस इतरांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यातच कामावर असताना कोणत्याही सोयी सुविधा नसल्याने त्यांनाही करोनाची लागण होत आहे. काही अधिकारी आणि पोलिसांना यामुळे प्राणदेखील गमवावे लागले आहेत.

अशा वेळी त्यांचे आभार न मानता अनेकजण त्यांच्यावर हल्ला करत आहेत, दगडफेक करत आहेत. ‘पोलिसवाला भी है इन्सान, वो भी पडता है बिमार’ असं म्हणत जितूने या रॅप साँगमधून लोकांना चपराक लगावली आहे.

पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा अनेकांनी आपापल्या परीने निषेध व्यक्त केला आहे. त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. मनस्वी कवी आणि संवेदनशील अभिनेता असलेल्या जितूने रॅपच्या माध्यमातून पोलिसांना अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.