Mumbai: कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त – अजित पवार

Mumbai: Karmaveer Bhaurao Patil's mantra of 'self-dependence' is useful even today - Ajit Pawar

एमपीसी न्यूज – कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोचवली.  आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीर अण्णांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. ‘कोरोना’ नंतर राज्याला सावरण्यासाठी  त्यांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले.

कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यात शिक्षणाचे मोठे काम केले. ‘कमवा आणि शिका’ हा स्वावलंबनाचा स्वाभिमानी मंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला. रयत शिक्षण संस्थेच्या या योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले, त्यांनी राज्यासह देशाचे नाव मोठे केले. रयत शिक्षण संस्थेसाठी स्वावलंबन, स्वाभिमान, स्वतंत्र आणि स्वाध्याय ही चतुःसूत्री त्यांनी घालून दिली, असे पवार यांनी सांगितले.

‘कोरोना’च्या नंतरच्या लढाईत महाराष्ट्राला उभारी आणण्यासाठी त्यांची ‘स्वावलंबना’ची शिकवण आपल्याला उपयुक्त ठरेल. कर्मवीर अण्णांचे शैक्षणिक कार्य, विचार, योगदान सदैव प्रेरणा देत राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.