Mumbai: कोरोना विरुद्ध लढ्यात सहभागी होण्याचे लतादीदी, अमिताभ, सचिन यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’ला समर्थन देत गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सुपरस्टार अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आदी सेलिब्रिटींनी देशवासीयांना कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून या तीन प्रमुख मान्यवरांनी त्यांची याबाबतची मते नोंदविली आहेत.

लता मंगेशकर यांनी म्हटले आहे की, कोरोनाशी लढण्याची जबाबदारी काय फक्त सरकारचीच आहे? आपले काहीच दायित्व नाही का? आपण शासनाला साथ द्यावी आणि स्वतःच्या तसेच समाजाच्या आरोग्याचे रक्षक बनावे, अशी माझी आपणा सर्वांना प्रार्थना आहे.

अमिताभ यांनी काव्यात्मक पद्धतीने सर्व भारतीयांना आवाहन केले असून कोरोनाला गाडून टाकण्याचा संकल्प सर्वांनी करावा, अशी हात जोडून नम्र विनंती केली आहे.
अमिताभ यांनी ट्वीट केलंय….

 “हाथ हैं जोड़ते विनम्रता से आज हम ,

सुनें आदेश प्रधान का, सदा तुम और हम ;

ये बंदिश जो लगी है, जीवदायी बनेगी,
21 दिनों का संकल्प निश्चित Corona दफ़नाएगी” !!!

 

सातत्यपूर्ण शिस्त आणि दृढनिश्चयाची गरज – सचिन

सोप्या गोष्टी करणेच नेहमी सर्वात कठीण असते, कारण त्यासाठी सातत्यपूर्ण शिस्त आणि दृढनिश्चयाची गरज असते, असे सचिन तेंडुलकरने सांगितले आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना 21 दिवस घरी थांबण्यास सांगितले आहे. ही सोपी गोष्ट लाखो जीव वाचवू शकते. कोविड -19 विरुद्धच्या लढाईसाठी आपण सर्व संघटित होऊयात, असे आवाहन सचिनने केले आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.