Mumbai : जाणून घेऊया ‘दबंग’ मधला ‘छेदीसिंह’ म्हणजे खरा सोनू आहे तरी कसा ?

Let's find out how 'Chhedi Singh' in 'Dabang' is real sonu

एमपीसीन्यूज  : स्व: खर्चाने स्थलांतरित नागरिकांना आपल्या घरी पोचण्यासाठी मदत करुन हिंदी अभिनेता सोनू सूदने लोकांची मने जिंकली आहेत. त्याने एक दूरध्वनी क्रमांक लोकांना दिला होता आणि त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. लोकांनी त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद दिला. सोनूने त्या सर्वांची घरी जाण्याची आपल्या खर्चाने सोय केली. सध्या सोनूच्या माणुसकीच्या भावनेतून केलेल्या मदतीवर प्रशंसेचा वर्षाव होत आहे.

पण आपल्याला दबंगमधला छेदीसिंह हा व्हिलन म्हणजे अभिनेता सोनू सूद एवढेच माहित आहे. या पलीकडे सोनू माणूस म्हणून कसा आहे हे या निमित्ताने लोकांसमोर आले.

1999 मध्ये ‘कल्लाझागर’ या तामिळ चित्रपटातून कारकीर्दीची सुरुवात करणा-या  सोनूने आतापर्यंत 100 हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात हिंदी, तामिळ, कन्नड आणि इंग्रजीशिवाय ‘कुंग फू योगा’ या चायनीज चित्रपटाचाही समावेश आहे.

पंजाबमधील मोंगा येथील रहिवासी असलेल्या सोनूचे वडील कपड्याचे व्यापारी, तर आई इंग्रजीची प्राध्यापिका होती. 70  च्या दशकात पंजाबमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात ‌वाढली होती. त्यामुळे सोनूला आई-वडिलांनी शिक्षणासाठी पंजाबबाहेर जाण्याचा सल्ला दिला.

पदवी संपादन करण्यासाठी सोनूने नागपूर गाठले. इंजिनिअरिंग महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात सोनूला मित्रांनी अभिनय आणि मॉडेलिंगसाठी प्रोत्साहन दिले. यापूर्वी सोनूने कधीही नाटकात किंवा इतर ठिकाणी अभिनय केला नव्हता. मित्रांच्या सांगण्यावरून मॉडेलिंगला सुरुवात केली.

पदवीनंतर सोनू 1996  ला मुंबईत पोहोचला. येथे त्याचा संघर्ष सुरू झाला. घरून पैसे घ्यायचे नव्हते म्हणून नोकरी केली. नोकरीतून वेळ काढून आपले फोटो स्टुडिओत द्यायचा. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. सात महिन्यांनी सोनू दिल्लीला रवाना झाला. पहिली संधी ‘नागराज’ या जाहिरातीत मिळाली. दिल्लीत मॉडेलिंग करताना तामिळ चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली.

ट्विटरवर एका युजरने सोनू सूदच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढत एक रेल्वे पास शेअर केला. सोनूने रीट्विट करत लिहिले की, ‘लाइफ इज अ फुल सर्कल’. तो रोज नोकरीसोबत आपले फोटो स्टुडिओत देण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करायचा. बोरिवलीपासून ते चर्चगेटपर्यंतचा प्रवासासाठी हा पास 420  रुपयांमध्ये तयार केला होता. ही 1998  ची गोष्ट आहे.

सोनू वेब इंडियाच्या पब्लिक पोलमध्ये देशातील सर्वोच्च १०० हँडसम पुरुषांमध्ये निवडला गेला आहे. तो जिममध्ये दररोज दोन ते अडीच तास घाम गाळतो. व्यायामाची सुरुवात 20 मिनिटांच्या कार्डियो एक्झरसाइजने करतो. कार्डियोनंतर अॅब्स एक्झरसाइजनंतर वेट ट्रेनिंग करतो.

तो स्विमिंग, सायकलिंग, ब्रिक्स वॉक, किक बॉक्सिंग आणि योगही करतो. सोनू शाकाहारी आहे. मात्र, प्रोटीनसाठी अंडी खातो. तो सप्लिमेंट्सही घेत नाही.

सोनूच्या आयुष्यावर त्याच्या आईवडिलांचा खूप मोठा प्रभाव आहे. मदत करण्याची प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाल्याचे सोनू सांगतो.  त्याला ‘कल्लाझागर’ या तामिळ चित्रपटात काम करण्याची पहिली संधी मिळाली. पहिल्या चित्रपटानंतर सोनूच्या आईने त्याला तामिळ शिकण्यासाठी एक पुस्तक पाठवले. भाषा शिकण्यासाठी त्याने दिवसरात्र कष्ट घेतले.

यानंतर त्याला तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही संधी मिळू लागली. सोनूने 2002  मध्ये ‘शहीद-ए-आझम’ या पहिल्या हिंदी चित्रपटात अभिनय केला. यानंतर दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘युवा’ चित्रपटात त्याने अभिषेक बच्चनच्या भावाची भूमिका साकारली. सोनूच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू इयर आणि सिंबासारखे चित्रपट आहेत.

2017  च्या ‘कुंग फू’ योगा या चित्रपटात सोनूने अभिनय केला आहे. हा चित्रपट चीनशिवाय भारतातही प्रदर्शित झाला होता. यासाठी सोनूने चीनमध्ये बीजिंगमघ्ये राहून जॅकी चॅनच्या मुलासोबत सात महिने प्रशिक्षण घेतले.

चित्रपटाच्या गरजेनुसार येथे उणे 10 डिग्री तापमानात प्रशिक्षण व्हायचे. ‘कुंग फू’ चित्रपटाचे भारतातील प्रमोशन सोनूनेच केले होते. जॅकी चॅनही सोनूच्या विनंतीने 2017  मध्ये एका दिवसासाठी भारतात आले होते. चीनमध्येही सोनू लोकप्रिय आहे.

पंजाबातील पतियाळा येथे 30 जुलै 1973 रोजी सोनूचा जन्म झाला. त्यानंतर त्याने नागपूर येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून  इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पत्नी सोनाली आणि दोन मुले, इशांत आणि अयान असे सोनूचे कुटुंब आहे.

त्याची पत्नी चित्रपटक्षेत्राशी संबंधित नाही. सोनूचे मुंबई येथे शक्ती सागर प्रॉडक्शन हाऊस असून लव्ह लाते हॉटेलची फ्रेचांइजी आहे. तसेच पंजाबमध्ये शॉपिंग मॉल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.