Mumbai : हृतिकसोबत असलेल्या ‘या’ मुलाला ओळखा पाहू ?

एमपीसीन्यूज : सध्या लॉकडाऊनच्या काळात जुने फोटो शेअर केले जात आहेत. थ्रोबॅक मेमरीज अशा या फोटोंमधून जुन्या आठवणी समोर येत आहेत. अशीच एक आठवण बॉलिवूडच्या सध्याच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्याने त्याच्याकडे जपून ठेवली आहे. बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या या फोटोतील हा मुलगा आहे अभिनेता विकी कौशल.

तेव्हा हृतिकची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ होती. सध्या हृतिकप्रमाणेच विकीचीसुद्धा आता तरुणाईमध्ये फार क्रेझ आहे. तेव्हा हृतिकचा ‘कहो ना प्यार है’नुकताच प्रदर्शित झाला होता आणि त्याची देशभरात भरपूर क्रेझ होती.

‘कपाटाचा ड्रॉवर साफ करताना मला हा फोटो सापडला. मी हृतिकच्या ‘फिजा’ चित्रपटाच्या सेटवर गेलो होतो तेव्हाचा हा फोटो आहे. त्यावेळी ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता आणि मीसुद्धा त्याच्या असंख्य चाहत्यांपैकीच एक होतो’.

‘त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की, हृतिक त्यांनाच भेटतो ज्यांना ‘इक पल का जीना’ या गाण्यावर नाचता येतं. मीसुद्धा त्या व्यक्तीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तीन दिवस या गाण्यावर नाचण्याची प्रॅक्टीस केली होती. पण, ज्यावेळी मी हृतिकला भेटलो, तेव्हाचा तो क्षण मी शब्दातही मांडू शकत नाही.

जवळपास तासभर मी हृतिककडे नुसता बघतच होतो. कारण कदाचित माझ्यासाठी तो केवळ पुरुष नाही तर महापुरुष आहे’, असं भलंमोठं कॅप्शन लिहित विकीने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

त्याच्या या कॅप्शनमधून एक अभिनेता म्हणून नव्हे तर, एक सर्वसामान्य चाहता म्हणून त्याने भावना व्यक्त केल्या. विकी सध्याच्या घडीला चांगलाच नावाजला जात आहे. ‘मसान’ या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याला ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.