Food Tour of India : चला करुया खाद्यभ्रमंती भारताची…

Let's go on a food tour of India ...

एमपीसीन्यूज : भारताला खूप मोठी खाद्य परंपरा आहे, प्रत्येक प्रांताची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्या ठिकाणच्या हवामानानुसार  तेथे उगवणा-या पदार्थानुसार, राहणीमानानुसार एवढेच नव्हे तर तेथील जंगलसंपत्ती प्रमाणे पदार्थ बनवले जातात. कधी साधे तर कधी मसालेदार. आणि कुठल्या पदार्थात कुठला मसाला घालायचा याचे गणित अगदी शतकानुशतके ठरलेले आहे. म्हणजे गोड पदार्थाची लज्जत वाढवण्यासाठी त्यात वेलची किंवा केशर किंवा केवड्याचे पाणीच घातले जाणार. तर तिखटमिठाच्या म्हणजे खस्ता पदार्थात ओवा, जिरं, बडीशेप असणार. अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि पंजाबपासून ते ईशान्य भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

भारतातील काही प्रसिद्ध आणि जास्त बनवल्या जाणा-या पाककृती कोणत्या याचा सहजगत्या आढावा घेतला असता काही पाककृती पुढे आल्या. हा आढावा प्रांताप्रमाणे घेतला तर काश्मीरचा नंबर पहिला येतो. त्यामुळे तिथली सर्वात प्रसिद्ध डिश म्हणजे रोगनजोश. यात खास करुन बडीशेपेचा वापर करुन बनवली जाणारी नॉनव्हेज डिश.

त्यानंतर पंजाबी लोकांची सर्वात आवडती डिश म्हणजे बटर चिकन. ही खास बटरमध्ये बनवली जाणारी  चिकनची शाही रेसिपी. कांदा, टॉमेटो, काजूचा मुबलक वापर आणि तंदुरी चिकनचे पीस म्हणजे खास पंजाबी बटर चिकन.

यापुढे बांगला स्पेशल डिशचा नंबर येतो, तो म्हणजे भापा आलू. नावातच सगळं काही सांगणारी ही पाककृती. वाफेवर शिजवलेले बटाटे आणि खास बंगाली पंचफोरनचा तडका ल्यालेली ही भापा आलू म्हणजे बाबूमोशायांचा जीव की प्राण.

नंतर प्रसिद्ध आहे ती राजस्थानची डेलिकसी म्हणजे बंजारी गोश्त. एकतर राजस्थानमध्ये नॉनव्हेज खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ले जात नाही. पण जे खाल्ले जाते ते सावकाश बनवलेले, खूप मुरवलेले आणि रात्रभर शिजत ठेवलेले असे असते.

यात मसाले कमी प्रमाणात असतात. तेथील राहणीमानाचा आणि वातावरणाचा या डिशवर मोठा प्रभाव आहे.

गॉडस् ओन कंट्री असा जिचा बोलबाला आहे अशा केरळमधली चिकन स्ट्यू आणि अप्पम ही मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाणारी डिश आहे.

नारळाच्या दुधाता शिजवलेले चिकनचे तुकडे, कमीतकमी पण फ्रेश मसाला आणि तांदुळाचे मऊ लुसलुशीत अप्पम म्हणजे केरळातील एनी टाइम फेवरिट डिश.

लखनवी नवाबांना विसरुन कसं चालेल बरं,  त्यांचे खास लखनवी मसाल्यांनी सजलेले तोंडात टाकताच विरघळणारे काकोरी कबाब म्हणजे एकदम यम्मी.

लखनौच्या जवळच्या काकोरी या गावामुळे प्रसिद्ध असलेले हे कबाब कोवळ्या मटणापासून आणि खास मसाल्यापासून बनवलेले असतात. जोडीला कोथिंबीर, पुदिन्याची चटणी मस्टच.

आता नबाबांचा विषय निघालाच आहे तर आणखी एक नबाबी डिश बघूया. हैद्राबादी स्पेशल बिर्याणी म्हणजे तोंडाला पाणीच. ही जरी दक्षिणेतील प्रसिद्ध डिश असली तरी ती आता सातासमुद्रापारसुद्धा फेमस आहे. मसाल्यामध्ये मुरवलेले चिकन किंवा मटण आणि खास बासमती तांदुळाच्या साथीने बनलेली ही डिश म्हणजे पूर्णान्नच.

‘केम छो’ म्हटल्यावर जसे गुजराती आठवतात ना त्याच बरोबर त्यांचा ढोकळा पण लगेच डोळ्यासमोर येतो. बेसनापासून बनलेला आणि फोडणीने सजलेला मऊ, लुसलुशीत, आंबटगोड ढोकळा आपला नाश्ता खमंग बनवतो. त्यासोबत तळलेली मिरची आणि आंबटगोड चटणी म्हणजे स्वर्गसुखच.

मूळचे पर्शियामधून इथे आलेले पण आता पूर्णपणे भारतीय झालेल्या पारशी लोकांची सल्ली बोटी ही एक प्रसिद्ध डिश. टॉमेटो, कांदा, व्हिनेगरमध्ये बनवलेले मटण आणि त्याच्या जोडीला बटाट्याच्या तळलेल्या सळ्या म्हणून या डिशचे नाव सल्ली बोटी.

दाक्षिणात्य लोकांचे जेवण ज्यापासून सुरु होते ती इडली सांबार सोबत खोब-याची टेस्टी चटणी म्हणजे परफेक्ट ब्रेकफास्ट. खरंतर दिवसाच्या कोणत्याही वेळी खाल्ली तरी ही डिश पोट भरल्याची जाणीव देते.

अशी एक डिश भारतीयांची खास आहे, की ती बनवण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाने केला असेल. आणि ती इतकी सोपी आहे ना की कशीही बनवली तरी पोट भरतेच, ती म्हणजे सिग्नेचर भारतीय डिश खिचडी. अगदी बिरबलापासून ज्याचे संदर्भ आहेत ती खिचडी पोटभर तर आहेच पण करायला तर अगदी सोपी आणि कमीतकमी साहित्यात होणारी आहे.

हे सगळं झाले पण ती हिंदी फिल्ममधली मॉ के प्यार का वास्ता देणारी जगप्रसिद्ध खीर राहिलीच की, तिला विसरुन कसे बरे चालेल.

तांदूळ, रवा, मखाना, दलिया अगदी कशापासूनही खीर बनवता येते. फक्त तुमच्याजवळ कल्पकता हवी. मग तिची फिरनी होते किंवा पायसम किंवा अगदी मणगणे सुद्धा. नाव काहीही द्या ती आहेत मॉ के हाथ की खीर.

या सगळ्याबरोबर महाराष्ट्राने संपूर्ण देशाला नव्हे तर जगाला एक सोप्पी डिश दिली आहे. कोणती म्हणून काय विचारता अहो आपला खमंग, चमचमीत, तोंडाला पाणी आणणारा वडापाव. बटाट्याच्या मसालेदार मिश्रणाला बेसनात घोळवून खमंग तळलं की जे काही बनतं ना त्याला कशाचीच तोड नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.