Mumbai : रेड वगळून ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये उद्यापासून मर्यादित उद्योग सुरु केले जाणार – मुख्यमंत्री

एनपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित करताना रेड झोन वगळता ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही नियम शिथिल करत उद्योगधंदे सुरु करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहणार असून फक्त मालवाहतुकीला परवानगी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात कालपर्यंत जवळजवळ 66 हजार 700 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 95 टक्के टेस्ट नेगेटीव्ह आल्या आहेत. तर 3 हजार 648 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत यापैकी सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असणारे रुग्ण जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात रेशन वितरण योग्य चालू असून केशरी रेशनकार्डधारकांना सुद्धा अन्नधान्य वितरण करण्याचे काम सुरू आहे तसेच केंद्र सरकार कडे डाळ आणि गहू यांची मागणी केली आहे. राज्यातले अर्थचक्र सुरू करण्यासाठी उद्यापासून (दि. 20) मोजक्या भागात उद्योगधंदे सुरू केले जाणार आहेत. रेड वगळून ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये मर्यादित उद्योग सुरु केले जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचारी लोकांची काळजी घेण्याचे व कोणत्याही प्रकारची प्रवासी वाहतूक न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच व्हायरसची वाहतूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

वृत्तपत्र स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध होतील पण घरोघरी वितरणाला बंदी कायम राहील, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याची विनंती त्यांनी केली आहे. अँटी कोरोना पोलीसचा उल्लेख करून पोलिसांचे खास कौतुक त्यांनी केले. सीएसआरसाठी वेगळे बँक खाते निर्माण केले असल्याची माहिती त्यांनी दिली. घरगुती हिंसाचार व अन्याय या विरोधात तक्रार करण्यासाठी 100 नंबर सुरू करण्यात आला आहे, मुंबई महापालिका आणि बिर्ला यांच्या सौजन्याने 1800-120-820050  हा नंबर तर आदिवासी विभाग व प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्य यांच्या मार्फत 1800-102-4040 हा नंबर तक्रार नोंदवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. परप्रांतीय बांधवाना काळजी न करण्याचे व संयम राखण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.