Mumbai : नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी ‘महा करिअर पोर्टल’ सुरू – वर्षा गायकवाड

राज्यातील 66 लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

एमपीसी न्यूज – नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारने ‘महा करिअर पोर्टल’ सुरू केले आहे. आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती या पोर्टलवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’ चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

ऑनलाईन घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य, शिक्षक, समुपदेशक, विद्यार्थी व शिक्षण विभागातील अधिकारी असे मिळून जवळपास 10 हजार लोकांनी उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी केले. राज्यातील 9 वी ते 12 वीच्या 66 लाख विद्यार्थ्यांना या पोर्टलचा फायदा होईल.

या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे 556 अभ्यासक्रम व 21000 व्यावसायिक संस्था व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली असून अभ्यासक्रमांचा कालावधी, शुल्क, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध संधी आदी माहिती या पोर्टलवर मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो, संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे युनिसेफ इंडियाचे शिक्षण विभाग प्रमुख टेरी डुरीयन यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पोर्टल तयार केल्याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, यांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन उपसंचालक समन्वय विकास गरड, यांनी केली.

www.mahacareerportal.com हे करिअर पोर्टल असून विद्यार्थ्यांना या पोर्टलवर भेट देऊन उपलब्ध माहितीचा लाभ घेता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.