Mumbai : ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’द्वारे चाईल्ड पॉर्नविरुद्ध लढणारे महाराष्ट्र बनले प्रथम क्रमांकाचे राज्य

एमपीसी न्यूज – चाईल्ड पॉर्नविरुद्ध सुरू असलेल्या विशेष ‘ऑपरेशन ब्लॅकफेस’द्वारे चाईल्ड पॉर्नविरुद्ध लढणारे महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. लाॅकडाऊन दरम्यान वाढलेला चाईल्ड पॉर्नचा प्रकार अतिशय गंभीर असून याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

लाॅकडाऊनच्या काळात इंडिया चाईल्ड प्रोटेक्शन फंडने केलेल्या संशोधनात चाईल्ड पॉर्न, सेक्सी चाईल्ड आणि टीन सेक्स व्हिडिओ सर्चच्या मागणीत जोरदार वाढ झाल्याचे ताज्या आकडेवारीत निदर्शनात आले आहे. महाराष्ट्रात सायबर विभागाकडून या विरोधात आत्तापर्यंत 133 गुन्हे दाखल झाले असून आयपीसी, आयटी ॲक्ट, पोस्को कलमांतर्गत 46 जणांना अटक करण्यात आली आहे. अनेक केसेसचा तपास सुरू असुन त्यानंतर आणखी गुन्हेगारांना अटक करण्यात येणार आहे.

नवी दिल्लीसह, मुंबई, कोलकाता, इंदौर आणि इतर 100 भारतीय शहरांमधील ट्रेंड मॅप करणाऱ्या ‘बाल लैंगिक अत्याचार सामग्री’ नावाच्या अहवालात लाॅकडाऊन पूर्वीच्या तुलनेत भारताच्या पॉर्नहबवरील वाहतुकीत 95 टक्के वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाॅकडाऊन मुळे बाल बलात्कारी, चाईल्ड पॉर्न व्यसनी ऑनलाईन येत आहेत. मुलांसाठी हा मोठा धोका बनू शकतो अशी व्यक्त केली जात आहे.

तसेच घरबसल्या खेळण्यासाठी, मित्र, मैत्रीणींशी गप्पांसाठी मुलांकडून इंटरनेटचा वापर केला जात आहे याचा फायदा गुन्हेगार सायबर-ट्रॅफिकिंग, ग्रूमिंग आदींसाठी करू शकतात त्यामुळे पालकांनी याबाबत सतर्कता बाळगावी असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच आॅनलाईन चाईल्ड पॉर्नविरुद्ध तपास अधिक गतिमान करण्याचे यापूर्वीच सायबर विभागाला निर्देश देण्यात आले आहेत. मात्र पालकांनी सावध राहावे असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.