Mumbai : मटका किंग रतन खत्री यांचे मुंबईत निधन

एमपीसी न्यूज – मटका किंग रतन खत्री यांचे मुंबईत शनिवारी (दि. 10) सकाळी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. खत्री मागील काही दिवसांपासून आजारी होते. खत्री यांनी 1960, 70 च्या दशकात मटका धंद्याचा प्रचंड विस्तार केला होता. त्यावेळी या धंद्याची एका दिवसाची उलाढाल सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत असायची.

रतन खत्री हे मुंबई सेंट्रल येथील नवजीवन सोसायटीत आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास होते. सिंधी परिवारातील खत्री 1947 मधील भारत विभाजनाच्या वेळी पाकिस्तानातील कराची शहरातून मुंबईत आले होते. मटका नावाने खेळला जाणारा जुगार 1962 साली मुंबईत सुरू झाला.

खत्री सुरुवातीला सुरेश भगत याच्या धंद्यात मॅनेजर म्हणून रुजू झाले. त्यानंतर 1964 साली त्यांनी भगतच्या धंद्यातून बाहेर पडून रतन मटका हा धंदा सुरू केला.

खत्री यांनी मटका धंद्याला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. काही दशके त्यांचा या व्यवसायात दबदबा होता. बेकायदेशीर असूनही मुंबईत मटका धंदा मोठ्या प्रमाणात चालत असे. त्यावेळी न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मध्ये कापसाचा भाव सुरू आणि बंद होण्यावर मटका खेळला जात असे.

एका मटक्यात चिठ्ठ्या टाकून हा जुगार खेळला जात असे. त्यामुळे याला ‘मटका’ असे नाव पडले. या जुगाराची उलाढाल त्या काळी दररोज कोटींच्या घरात होत असे.

60-70 च्या दशकात या धंद्याकडे अनेक तरुण खेचले गेले. खत्री यांच्या निधनाने मटका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.