Mumbai : पित्तशामक कोकमाचे औषधी गुणधर्म

Medicinal properties of biliary cocaine

एमपीसीन्यूज : आपण नेहमी वापरणाऱ्या बऱ्याचशा खाद्यपदार्थांमध्ये अनेक पदार्थ हे औषधी गुणधर्माचे आहेत. पश्चिम किनारपट्टीवर मिळणारी अनेक फळे ही भारताच्या इतर भागात फारशी मिळत नाहीत. पण त्यांच्या औषधी गुणांमुळे ती नियमित वापरणे फायद्याचे आहे.  असेच एक दिसायला सुंदर आणि गुणांनेही सुंदर असलेले फळ म्हणजे कोकम. याला स्थानिक भाषेत रातांबा देखील म्हणतात. या कोकमापासून आमसूल तयार करतात. अनेक आजार बरे करण्यासाठी कोकम औषध म्हणून वापरतात.

मराठीत कोकम तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे.

याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. याचे फळ जांभळट, लाल रंगाचे व रसदार असते. हे फळ सुकल्यानंतरच त्याचा कोकम किंवा आमसूल म्हणून वापर करतात.

याच फळांचा रस काढून त्याचे सरबत, सोलकढी बनविली जाते. कोकमाच्या पांढ-या रंगाच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणून तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्येही वापरतात.

औषधी गुणधर्म

कोकमामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बियांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.

कोकमाचे अनेक उपयोग आहेत. चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे. कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करुन प्यायल्यास अपचन दूर होते.

कोकमामध्ये पाणी घालून त्याचा कल्क बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.

उन्हाळ्याच्या दिवसात कोकम सरबत हा एक खूप चांगला पर्याय आहे. तसेच ऑक्टोबर हीटच्या वेळी देखील पित्तप्रकोप कमी करण्यासाठी कोकम सरबत अवश्य प्यावे.

कोकमाचा रस, नारळाचे दूध, कोथिंबीर व थोडे ताक एकत्र करुन त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते.

अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमाचे कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.

अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क म्हणजे रस संपूर्ण अंगास लावावा. पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.

हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमाचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो. हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमाचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.

हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमाचे तेल गरम करुन शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.

आजही कोकणातील जुन्या घरांमध्ये कोकमतेलाचा गोळा थंडीमध्ये वापरला जातो.

रोजच्या आहारामध्ये कोकमाचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.

कोकमाचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.

कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करुन ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.

मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्यावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.