Mumbai : आमदारांना विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये मिळणारे स्वस्त जेवण बंद करा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – संसदेच्या कॅन्टीनमध्ये खासदारांना मिळणारे स्वस्त जेवण बंद केल्याच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे, अशी मागणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “संसदेच्या कॅन्टीनमध्ये सर्व खासदारांना स्वस्तात जेवण मिळत होते. त्यामुळे देशाच्या तिजोरीवर 17 कोटींचा बोजा पडत होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद कॅन्टीनमध्ये खासदारांना स्वस्त जेवण मिळावे, यासाठी केंद्र सरकारकडून दिली जाणारी सबसिडी रद्द करण्याचा प्रस्ताव नुकताच लोकसभेत मांडला. त्याला सर्वपक्षीय खासदारांनी एकमताने मान्यता देऊन देशाचे दरवर्षी खर्च होणारे 17 कोटी रुपये वाचविले आहेत.

महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टीनमध्येही राज्यातील आमदारांना सवलतीच्या दरात जेवण व इतर खाद्यपदार्थ दिले जातात. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कोट्यवधींचा बोजा पडत आहेत. आमदार फार कमी वेळा विधानभवनाच्या कॅन्टिनमधल्या जेवणाचा स्वाद घेतात. त्यामुळे स्वस्तात जेवण देण्याचा आमदारांना फार काही फायदा होत नाही. उलट राज्य सरकारचे पैसे नाहक खर्च होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर महाराष्ट्र विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये आमदारांना सवलतीच्या दरात मिळणारे जेवण बंद करण्यात यावे. त्यामुळे शासनाची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बचत होईल, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.