Mumbai : विमानतळावरून थेट पुण्याला वातानुकूलित एसटीबस धावणार ?

एमपीसी न्यूज- आता मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पुण्याला जाण्यासाठी काळजी करण्याची गरज नाही. या प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा देण्याचा विचार एसटी महामंडळाकडून केला जात आहे. या संदर्भात एसटी महामंडळाची मुंबई विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा सुरू असल्याचे समजते.

मुंबई विमानतळावरील प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी खासगी टॅक्सी सेवेवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. टॅक्सीचालक मनाला येईल तसे दर आकारतात त्यामुळे प्रवाशांचा मनःस्ताप होतो, पण पर्याय नसल्याने अधिक पैसे देऊन त्यांना खासगी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांच्या सोयीसाठी बंगळूरुच्या धर्तीवर मुंबई विमानतळाबाहेर बससेवा देण्याचा एसटीचा प्रयत्न आहे.

शिवनेरीबरोबरच शिवशाही बसगाडय़ांचीही सुविधा देखील या प्रवाशांना देण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला एक शिवनेरी बस चालवल्यानंतर त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला येथूनही पुण्यासाठी गाडय़ा सुटतात. त्यांचीही जोडणी राष्ट्रीय मुंबई विमानतळाला देण्यात येऊ शकते का, याची चाचपणी केली जात आहे.

“मुंबई विमानतळ प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा केली जात आहे. मुंबई राष्ट्रीय विमानतळाबाहेर एसटी गाडय़ा उभ्या करण्यासाठी जागा देण्यावरून चर्चा करण्यात आली”असल्याची माहिती एसटीच्या एका अधिकाऱ्याने दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.