Mumbai: लॉकडाऊनमुळे ‘नागिन-4’ मालिकेचे मानधन रखडले, अभिनेत्रीला झाले घर चालविणे कठीण!

Mumbai: 'Nagin-4' series honorarium stuck due to lockdown

एमपीसी न्यूज – करोनाच्या साथीने आता आपल्या रुटीनमध्ये पण खूप बदल घडवून आणला आहे. एकेकाळी संध्याकाळी विविध चॅनेल्सवर चालणा-या सिरियल्स बघत दिवस कसा संपत असे ते कळत नव्हते. आत्ता ही सिरियल, मग ती सिरियल असे करता करता रात्र कधी होत असे समजत नसे. एवढेच नव्हे तर कधी एखादा एपिसोड बघता आला नाही तर त्याचा रिपीट टेलिकास्ट नक्की बघितला जायचा. पण… करोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर संपूर्ण देशात लॉकडाउनची सुरु झाले. याचा फटका अनेकांना बसताना दिसत आहे. पण त्यात जास्त नुकसान मालिका आणि चित्रपटांच्या निर्मात्यांचे होत आहे. तसेच मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील याचा फटका बसत आहे.

‘नागिन 4’ मालिकेतील अभिनेत्री सायंतनी घोषने घर चालवणे कठीण होऊन बसल्याचे अलिकडेच सांगितले आहे. सध्या कलाविश्वातील सर्व मालिका आणि चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकल्यामुळे छोट्या पडद्यावरील सगळ्या जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशातच अभिनेत्री सायंतनी घोषच्या अडचणी वाढल्या आहेत.

यासंदर्भात सायंतनीने दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, ‘लॉकडाउनमुळे माझ्यासमोर आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत. माझ्यासोबत अनेक कामगारांना देखील याचा सामना करावा लागत असेल. सध्या मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यामुळे आम्ही घरातच आहोत. प्रत्येकाला पुन्हा कामावर रुजू होण्याची इच्छा आहे. आम्ही लवकरात लवकर काम सुरु होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण हा सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. चित्रीकरणाच्यावेळी सुरक्षित अंतर पाळणे खूप आव्हानात्मक ठरणार आहे.

‘अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला पगार मिळायला हवा आणि पगार देण्यास कोणी नकार दिलेला नाही. पण ते पगार देणार कसे? ऑफिस बंद आहे. या परिस्थितीला सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. माझे पैसे देखील अडकले आहेत. मला माझ्या घराचा आणि कारचा इएमआय भरायचा आहे. सरकारने 2-3 महिन्यांसाठी यावर शिथिलता आणली आहे. पण मला माझे घर देखील चालवायचे आहे’ असंही तिने पुढे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.