New Delhi: भीषण! ‘बॉइज लॉकर रुम’सारख्या माध्यमांतून कोवळ्या मुलांमध्ये फोफावतोय ‘लैंगिक विकृतीचा विषाणू’!

मोबाईल वापरणाऱ्या पौंगडावस्थेतील मुला-मुलींकडे पालकांनी बारीक लक्ष ठेवण्याची गरज

एमपीसी न्यूज – सध्या दिल्लीच्या अल्पवयीन मुलांनी इन्स्टाग्रामवर घातलेला नंगानाच खूपच गाजतोय. कायदेशीरदृष्ट्या ही अल्पवयीन, अगदी कोवळ्या वयातील मुले, त्यांनी अभ्यास, खेळ यात रमायचं तर सेक्स, रेप यासारख्या गप्पा राजरोसपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांमध्ये मारताहेत. वाईट हे आहे की आपण त्यात काही गैर करतोय, असे त्यांना जरादेखील वाटत नाही.

हे तर काय या वयात करायच्याच गोष्टी आहेत, असा त्यांनी समज करुन घेतला आहे. जी माध्यमे आपले ज्ञान वाढवण्यासाठी वापरायची त्याचा असा गैरवापर करताना हे चुकीचे आहे, असे त्यांना अजिबात वाटत नाही ही खूप भीषण गोष्ट आहे.

दिल्ली आणि आसपासच्या उच्चभ्रू शाळांमधील काही अज्ञान मुलांनी इन्स्टाग्रामवर ‘बॉइज लॉकर रुम’ असा ग्रुप तयार केला. यातील बरीचशी मुले ही अज्ञान होती. थोडी अठरा वर्षांवरील होती. आजकाल प्रत्येक लहान मुलाच्या हातात देखील मोबाइल असतो. मग ही तर त्यामानाने मोठी मुले. मग त्यांनी मोबाइल वापरला तर त्यात गैर आहे असे त्यांच्या आई वडिलांना पण वाटत नव्हते.

पण त्यानंतर या त्यांच्या दिवट्यांनी मोबाइलवर जो नंगानाच घातला तो जेव्हा जगासमोर आला तेव्हा त्यांना कुठेतरी पळून जावेसे नक्की वाटले असणार. याच्या अॅडमिनला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण त्याआधी त्यांनी या ग्रुपवर जे काही प्रताप गाजवले त्यांनी सगळ्यांनाच इंटरनेट हे माध्यम वापरण्याजोगी या मुलांची वृत्ती आहे का याचा विचार करायला लावला.

त्यात भरीसभर म्हणून अशाच अज्ञान मुलींनीदेखील ‘गर्ल्स लॉकर रुम’ नावाचा एक ग्रुप तयार केला आणि त्यांनी देखील जे मुलांनी केलं तसंच त्या ग्रुपवर केलं. आहे की नाही इथे देखील सो कॉल्ड स्त्रीपुरुष समानता. आम्हीदेखील मुलांपेक्षा काहीही कमी नाही हे दाखवण्याचा आचरटपणा. त्यामुळे मुलगे काय किंवा मुली काय आता कोणीही यातून सुटलेले नाही.

करोनाच्या भीषण प्रकोपामुळे सध्या लहानथोर सगळेच घरात लॉकडाऊन आहेत. अशावेळी वेगवेगळ्या ऑनलाइन माध्यमातून मुलांचा अभ्यास सुरु आहे. आधी एक झूम नावाचे अॅप आले. त्याच्या माध्यमातून चीन आपला डाटा चोरतो असे समजल्यानंतर त्याचा वापर कमी होऊ लागला. आजही काही महाभाग हे अॅप वापरत आहेतच. त्याचे परिणाम भविष्यात त्यांना भोगावे लागणार आहेतच.

त्यानंतर विविध मार्गांनी मुले एकमेकांशी कनेक्ट होत गेली. अभ्यास राहिला बाजूला ती भलताच अभ्यास करु लागली. कदाचित पालकांचे त्यांच्यावर लक्ष नसेल किंवा मुले अभ्यास करत आहेत असाच त्यांचा समज होता. पण नंतर समोर आले ते फार विकृत होते. अभ्यास राहिला बाजूला वेगळ्याच गोष्टींचा अभ्यास सुरु होता.

आता मोबाइल शाप की वरदान यासारखे प्रश्न समोर येतील. त्यावर साधकबाधक चर्चा होतील. काही दिवसांनी आपण हे बाजूलाही ठेवून देऊ. पण ही गोष्ट निश्चितपणे अशी हलक्यात घेण्याची नाही. सध्या आपल्यासमोर करोनाचेच संकट मोठे आहे. पण या संकटापाठोपाठ आणखी किती संकटे आणि कोणकोणत्या प्रकारची येऊ शकतात याची ही एक झलक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आणि बरं ही दिल्लीतील गोष्ट आहे, आपल्याला काय त्याचं असं म्हणून सोडून देऊन चालणार नाही. हा अक्राळविक्राळ राक्षस आपल्या आजूबाजूला देखील असू शकतो. सध्या तो झोपलेला असेल. कदाचित त्याला काही मार्गांनी थोपवलेले असेल, पण तो आपल्यासमोर येणार हे नक्की आहे.

कारण अगदी पिंपरी-चिंचवड सारख्या त्यामानाने मागास शहरातदेखील एका शाळेमधील माजी आणि आजी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे ग्रुप केला होता. त्यात ते शाळेतील शिक्षिकांना टॅग करत. त्यांचे डायरेक्ट फोटो टाकत नसत पण अश्लील चित्रे टाकत असत. ही गोष्ट अचानकपणे उघड झाली. त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना समज देण्यात आली आणि तो मामला तेथेच थोपवण्यात आला. पण म्हणून हे लोण संपले असेल असे नव्हे. भविष्यात दुसरीकडे कुठेतरी ते उघड होऊ शकते.

या सगळ्यात आई बाबा आणि मुले यांच्यात संवाद असेल तर हे प्रमाण कमी होऊ शकते. पण दुर्दैवाने तो संवादच आज कमी झाला आहे. करोनाच्या संकटाने जसे आपण घरात अडकून पडलो आहोत त्याला एक संधी मानली तर हा संवाद पुन्हा सांधता येऊ शकतो. आईबाबांनी मुलांशी या विषयावर समजुतीने बोलणे गरजेचे आहे. किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक मनोविकृती फोफावणाऱ्या या विषाणूला वेळीच रोखले नाही तर कोरोनापेक्षाही महासंहार जगात घडल्याशिवाय राहणार नाही.

या लॉकडाऊनमध्ये हा एकमेकांमधला संवाद वाढवू या करोनाबरोबरच इतर जी काही संकटे येऊ घातली आहेत ती दूर करुया. जसं आपण कमीतकमी साधनसामग्रीसह जगायला शिकलो आहोत, तसे दर्जेदार जगायला देखील शिकूया!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.