Mumbai: राज्याने ओलांडला 500चा टप्पा, नवीन 47 कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णांची एकूण संख्या 537 वर

पुण्यात दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एक रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राने कोरोनाबाधित रुग्णांचा पाचशेचा टप्पा आज ओलांडला. राज्यात आज (शनिवारी) नवीन 47 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 537 झाली आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य खात्याच्या वतीने देण्यात आली. रुग्णांची संख्या वाढतच असल्याने महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात काल कोरोनाबाधितांची संख्या 490 होती. त्यात नवीन 47 रुग्णांची आज भर पडली. मुंबईत 28, ठाणे जिल्ह्यात 15, अमरावती 1, पुणे 2 व पिंपरी-चिंचवडमध्ये एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याचे आरोग्य खात्याच्या वतीने सांगण्यात आले. एकूण कोरोनाबाधितांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे मुंबईमध्येच सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 26 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.  दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज येथे झालेल्या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेले शेकडो लोेक राज्यात आल्यामुळे राज्यातील संसर्ग वाढण्यास मदत झाली. ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनचे सर्वांनी काटेकोर पालन करावे. घरामध्ये थांबावे, घराबाहेर पडू नये, कोणत्याही कारणास्तव कोठेही गर्दी करू नये. हात वारंवार सॅनिटायझरने स्वच्छ करावेत. मास्कचा वापर करावा अथवा तोंड स्वच्छ रुमाल अथवा कापडाने झाकून घ्यावे, असे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.