Mumbai Newes : मुक्त रिक्षा परवानाही बंद करणार : परिवहन मंत्री अनिल परब

एमपीसी न्यूज : रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून रिक्षा चालकांची अवाजवी विमा हफ्त्यातून सुटका करणे हे आपले स्वप्न आहे. ते महाआघाडी सरकारचा परिवहन मंत्री म्हणून आपण सत्यात आणणार आहोत, अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा पंचायत व राज्य रिक्षा संघटना कृती समितीच्या शिष्टमंडळाला आज दिली.

समितीचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव, सरचिटणीस नीतिन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी ते आज बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ.नीलम गोर्‍हे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते.

यावेळी परिवहन मंत्री म्हणाले, टाळेबंदीच्या काळात रिक्षा चालकांना आम्ही फार दिलासा देवू शकलो नाही याची आम्हाला जाणीव आहे. इतर वाहन धारकांना काही प्रमाणात तरी करमाफी देता आली. रिक्षा धारकांकडून सुरवातीलाच एक रकमी कर घेत असल्याने त्यांना तोही दिलासा देता आला नाही.पण अशा तत्कालिक मदतीपेक्षा रिक्षा चालकांचे आयुष्यभराचे कल्याण करणारे, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करणे हे माझं स्वप्न आहे.

या मंडळाकडे रिक्षाच्या विमा जोखिमीची जबाबदारी देवून सध्या भराव्या लागणार्‍या भरमसाठ विमा हफ्त्यातून रिक्षा चालकाला आम्हाला सोडवायचे आहे. यासाठी केंद्र सरकारचेही सहकार्य लागणार आहे, ते आम्ही मागू. भरमसाठ विमा हफ्ता मुक्ती बरोबरच पंचायतीच्या निवेदनात म्हंटल्या प्रमाणे वैद्यकीय सहाय्य, निवृत्ती नंतर लाभ, मुलांना शिक्षणासाठी मदत, अतिरिक्त उत्पन्न उपाय या मंडळा मार्फत रिक्षा चालकाला मिळतील.

तसेच रिक्षांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. हे म्हणणेही रास्त असून रिक्षाचा मुक्त परवनाही बंद करण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत. पुण्याच्या रिक्षा व छोट्या वाहनांचा तपासणीसाठी दिवे घाट वाचवण्यासाठी आळंदी रस्ता परिवहन कार्यालयात रोलर ब्रेक टेस्टर व 100 मीटर तपासणी धावपट्टीच्या कामालाही वेग देण्यात येईल.

लॉकडाऊन काळातील विमा परतावा मिळवून देण्यासाठी परिवहन विभागाचे वाहन बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी परिवहन आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या जातील. हलाखीच्या स्थितीत आलेल्या रिक्षा चालकांची मागणी असेल,तेथे रिक्षा भाडे दरवाढीचा विचार करण्याच्या सूचनाही आम्ही परिवहन प्राधिकरणाला दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

डॉ. आढाव यांनी मंत्री परब यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी ही मंत्र्याची शिष्टमंडळाची भेट घडवून आणली. शिष्टमंडळात सिध्दार्थ चव्हाण, आनंद बेलमकर, तुषार पवार,ओंकार मोरे, विशाल बागुल उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.